तरन्नुम खून प्रकरणातील संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी : निष्पक्ष तपासासाठी पाटगाव ग्रामस्थांचे निवेदन; राजकीय हस्तक्षेप झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

निष्पक्ष तपासासाठी पाटगाव ग्रामस्थांचे निवेदन; राजकीय हस्तक्षेप झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
तरन्नुम खून प्रकरणातील संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी
सिंहवाणी ब्युरो | रमेश पाटील, गारगोटी
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी धबधबा परिसरात तरन्नुम बशीर नाईक (वय २३) या तरुणीचा खून केल्याचा आरोप असलेल्या श्रीपाद दिनकर वडर (वय २५, रा. गारगोटी) याला रविवारी गारगोटी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणाचा कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष आणि सखोल तपास करावा, अशी मागणी पाटगाव ग्रामस्थ व तरन्नुमच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली.
लग्न ठरल्याने प्रेमसंबंधांना नकार; तरुणीला दरीत ढकलल्याचा आरोप
तरन्नुमचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरल्याने तिने श्रीपादसोबतचे प्रेमसंबंध पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला होता. याच रागातून श्रीपादने तिला नाईकवाडी धबधब्याच्या कड्यावरून खोल दरीत ढकलल्याचा आरोप आहे. शुक्रवारी (दि. ९) ही घटना घडली. घटनेनंतर संशयित स्वतःहून भुदरगड पोलीस ठाण्यात हजर झाला. शनिवारी आंबोली येथील बचाव पथकाच्या मदतीने सुमारे चार तास शोधमोहीम राबवून तरुणीचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात आला.
ठोस पुरावे गोळा करून लवकर दोषारोपपत्र दाखल करा
या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तपासादरम्यान ठोस पुरावे गोळा करावेत आणि लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करावे, अशा मागण्या ग्रामस्थांनी निवेदनातून केल्या आहेत. तसेच, पीडित कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.
तपासात दिरंगाई किंवा राजकीय हस्तक्षेप झाल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
संशयिताचे वकीलपत्र न घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन
तरन्नुमच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तिला न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणातील संशयितावर गंभीर आरोप असल्याने त्याचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये, असे आवाहन पाटगाव ग्रामस्थांनी केले आहे. तरन्नुमला न्याय मिळेपर्यंत तिच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी माजी सभापती बाबा नांदेकर, पाटगावचे ग्रामस्थ, तरन्नुमचे नातेवाईक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सिंहवाणी लाईव्ह न्यूज
निर्भीड • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता