रुग्णांची घरच्यांप्रमाणे काळजी घ्या; दर्जेदार आरोग्यसेवा द्या! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास सदिच्छा भेट : रुग्णालयीन कामकाजाबाबत समाधान; रुग्णांशी साधला आपुलकीचा संवाद

रुग्णांची घरच्यांप्रमाणे काळजी घ्या; दर्जेदार आरोग्यसेवा द्या!-
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास सदिच्छा भेट
रुग्णालयीन कामकाजाबाबत समाधान; रुग्णांशी साधला आपुलकीचा संवाद
गारगोटी | सिंहवाणी ब्युरो
सेवा संकल्प अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी १० ऑक्टोबर रोजी गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयास सदिच्छा भेट देऊन रुग्णालयातील आरोग्यसेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध विभागांना भेट देत उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. रुग्णालयातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त करताना, रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा द्या, त्यांची घरच्यांप्रमाणे काळजी घ्या आणि आरोग्यसेवेचे काम अधिक वाढवा, असा सल्ला त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
या भेटीदरम्यान मंत्री आबिटकर यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती घेतली. त्याच दिवशी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यामध्ये सहा सिझेरियन शस्त्रक्रिया (LSCS), तीन गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया (TAH) आणि एक योनीमार्गे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया (Vaginal Hysterectomy) झालेल्या रुग्णांचा समावेश होता.
तसेच प्रसूती विभागाला भेट देऊन नैसर्गिक प्रसूती झालेल्या दोन मातांची आणि रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या इतर रुग्णांचीही त्यांनी आपुलकीने विचारपूस केली. रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांच्या उपचारांची माहिती घेतल्याने आरोग्यसेवेतील रुग्णकेंद्री दृष्टिकोनाचे दर्शन घडले.
**रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य द्या**
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार, आवश्यक सुविधा आणि आपुलकीची वागणूक मिळणे महत्त्वाचे आहे. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना समाधानकारक आरोग्यसेवा मिळावी, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण व्हावे आणि वैद्यकीय सेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असा संदेश मंत्री आबिटकर यांनी या भेटीतून दिला.
या भेटीवेळी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
**सिंहवाणी लाईव्ह न्यूज**
*संपादक – किशोर आबिटकर*