जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुःखद निधन : धनाजी भोपळे यांचे अपघाती निधन गारगोटी-गडहिंग्लज मार्गावरील वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; मित्रपरिवारातून तीव्र हळहळ

दुःखद निधन :

धनाजी भोपळे यांचे अपघाती निधन
गारगोटी-गडहिंग्लज मार्गावरील वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;

मित्रपरिवारातून तीव्र हळहळ

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
गारगोटी बाजारपेठ येथील रहिवासी, वैचारिक बैठक असलेले आणि सामाजिक व राजकीय घडामोडींवर परखडपणे भाष्य करणारे श्री. धनाजी मारुती भोपळे यांचे आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने गारगोटी परिसरासह मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनाजी भोपळे हे आज पहाटे पाच वाजण्यापूर्वी पाल येथील आपल्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम कोल्हापूर येथे नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रुकडी येथील संस्थेत कार्यरत असलेल्या त्यांच्या परिचितांच्या माध्यमातून उपचाराची व्यवस्था करण्यात आली. मात्र, कोल्हापूर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

धनाजी भोपळे हे माजी खासदार बाळासाहेब माने यांच्या संस्थेत कार्यरत होते. सामाजिक, राजकीय तसेच विविध सार्वजनिक प्रश्नांची त्यांना चांगली जाण होती. कोणत्याही विषयाकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची त्यांची वृत्ती होती. समाजात आणि राजकारणात घडणाऱ्या घटनांवर ते अचूकपणे बोट ठेवत असत. खासदार निवेदिता माने यांच्याशीही त्यांचे अत्यंत मोकळे आणि वैचारिक स्वरूपाचे संबंध होते. विविध विषयांवर त्यांच्यात मनमोकळ्या चर्चा होत असत.

गारगोटीतील वाहतुकीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

धनाजी भोपळे यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर गारगोटी शहरातील वाढता वाहतुकीचा वेग आणि अपघातांचा धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहने तसेच लक्झरी बसेस मोठ्या वेगाने धावत असतात. शहरातून जाणाऱ्या या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता अरुंद असून वळणांवरही वाहनांचा वेग मोठा असतो. त्यामुळे पादचारी, व्यायामासाठी बाहेर पडणारे नागरिक तसेच स्थानिक वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७.१० वाजता ‘कदंबा’ची गोव्याकडे जाणारी बस एसटी बसला ओव्हरटेक करत असताना रस्त्याच्या कडेला व्यायाम करणाऱ्या नंदकुमार मोरे (निवृत्त उप अभियंता ) यांना अक्षरशः घासून गेल्याचा अनुभवही याच संदर्भात समोर आला आहे. त्या वेळी क्षणभर चुकून पाय मागे गेला असता तर गंभीर अपघात घडला असता, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी

गारगोटी शहरातील वाहतुकीचा प्रश्न केवळ अपघात घडल्यानंतर चर्चेचा विषय न राहता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे गरजेचे आहे.

भुदरगड पोलीस निरीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, गारगोटी उपविभाग यांनी गारगोटी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष अभ्यास करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

शहरातील अरुंद रस्ते, धोकादायक वळणे, वाहनांचा वाढता वेग आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता यांचा सर्वंकष अभ्यास करून वाहनांच्या वेगावर नियंत्रण, आवश्यक ठिकाणी वाहतूक नियंत्रणाची साधने, सूचना फलक आणि इतर सुरक्षा उपाय तातडीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून वाहतूक शिस्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचीही आवश्यकता आहे.

गारगोटीमध्ये पालकमंत्री वास्तव्यास असल्याने शहरातील या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

धनाजी भोपळे यांच्या अपघाती निधनाने एका चांगल्या वैचारिक मित्राला गारगोटीने गमावले आहे. त्यांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर गारगोटी शहरातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी ठोस पावले उचलणे हीच त्यांच्या मित्रपरिवाराची आणि प्रशासनाची जबाबदारी ठरेल.

धनाजी भोपळे यांना सिंहवाणी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button