ताज्या घडामोडी

भुदरगड तालुक्यात २,०८४ ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी सुरू! आरोग्य विभागाची थेट ऊसतोड तळांवर धाव; गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्याला प्राधान्य

भुदरगड तालुक्यात २,०८४ ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी सुरू!

आरोग्य विभागाची थेट ऊसतोड तळांवर धाव; गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्याला प्राधान्य

सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
भुदरगड : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने भुदरगड तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांचे आगमन झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे २ हजार ८४ ऊसतोड मजूर दाखल झाले असून, त्यांच्यासोबत गरोदर माता आणि शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचाही समावेश आहे. या मजुरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने विशेष आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

ऊसतोड तळावरच आरोग्य सेवा!

ऊसतोड मजुरांना आरोग्य तपासणीसाठी दवाखान्यापर्यंत येण्याची अडचण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाचे पथक थेट ऊसतोड तळांवर तसेच ऊसतोड सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन तपासणी करत आहे. आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी या मोहिमेत सक्रिय सहभागी झाले आहेत.

विशेषतः गरोदर मातांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जात आहे. मोफत सोनोग्राफीसाठी संदर्भ चिठ्ठी देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच गरोदर मातांना सकस आहार, औषधोपचार आणि आरोग्य केंद्रामार्फत मिळणाऱ्या विविध शासकीय सुविधांची माहिती दिली जात आहे.

बालकांचे लसीकरण, तापाच्या रुग्णांची तपासणी

ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील लहान बालकांची थंडी, ताप, खोकला, सर्दी आदी आजारांसाठी तपासणी केली जात आहे. आवश्यकतेनुसार लसीकरण करण्यात येत असून, तापाच्या रुग्णांचे रक्तनमुनेही घेतले जात आहेत. त्यामुळे आजारांचे वेळीच निदान करून उपचार करणे शक्य होणार आहे.

ऊसतोड मजुरांना हंगामादरम्यान प्रतिकूल हवामान, कष्टाची कामे, अपुरी विश्रांती आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तळावरच आरोग्य सेवा पोहोचविण्याचा उपक्रम राबविला आहे.

डॉ. आनंद वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

तालुक्यातील सर्व गावांमधील ऊसतोड मजुरांच्या तळांवर ही आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली RBSK टीम भुदरगडमधील डॉ. मीनाक्षी एस. वारूशे, डॉ. ऋषिकेश हजारे, मधुबाला जाधव आणि एएनएम दीपाली हांडे हे या मोहिमेत सहभागी आहेत.

आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे ऊसतोड मजूर, गरोदर माता आणि लहान बालकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणीच आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे. स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.

✍️ संपादक : किशोर आबिटकर
सिंहवाणी लाईव्ह न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button