जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षात भाजपला जोरदार धक्का! शंभूराज देसाईंची रणनीती यशस्वी; जयकुमार गोरेंची अध्यक्षपदाची गर्जना हवेतच!

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षात भाजपला जोरदार धक्का!

शंभूराज देसाईंची रणनीती यशस्वी; जयकुमार गोरेंची अध्यक्षपदाची गर्जना हवेतच!

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण बिनविरोध; शिवसेना-राष्ट्रवादीची एकजूट, ‘आगे आगे देखो होता है क्या’ म्हणत गोरेंचा सूचक इशारा!

सिंहवाणी ब्युरो / सातारा :
सातारा जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात बुधवारी मोठी उलथापालथ घडली. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला जोरदार राजकीय धक्का बसला असून, भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची अध्यक्षपदाबाबतची गर्जना अखेर हवेतच विरली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची अध्यक्षपदी, तर शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

या निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांची राजकीय रणनीती निर्णायक ठरल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून झालेल्या राजकीय धक्क्याची परतफेड शिवसेना आणि राष्ट्रवादीने जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणातून केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेची निवडणूक केवळ अध्यक्षपदाची निवड न राहता महायुतीतील अंतर्गत संघर्षाचे शक्तिप्रदर्शन ठरली आहे.

जयकुमार गोरेंची गर्जना फोल; चेहऱ्यावर नाराजी, शब्दांत मात्र संयम!

निवडणुकीपूर्वी भाजपचाच अध्यक्ष होणार, असा ठाम दावा करणारे आमदार जयकुमार गोरे यांना प्रत्यक्ष निकालानंतर राजकीय वास्तव स्वीकारावे लागले. निवडणुकीनंतर ते प्रसारमाध्यमांसमोर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत असल्याचे चित्र होते. पत्रकारांनी शिवसेना-राष्ट्रवादीने वचपा काढल्याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी अत्यंत संयमित प्रतिक्रिया दिली.

‘आता सातारा जिल्हा बँकेवर महायुतीचा अध्यक्ष झाला आहे. नाराजीचा विषय नाही. ज्यांचं बहुमत आहे, त्यांचा अध्यक्ष झाला. कोणी कशाचा वचपा काढला, हा आजचा विषय नाही. ती निवडणूक आम्ही वेगळी लढलो होतो. ही निवडणूक आम्ही एकत्र लढलो होतो. बाकी सगळ्या गोष्टी ऑफ द रेकॉर्ड आहेत,’ असे गोरे म्हणाले.

‘महायुतीने मला मतदान केले नाही; तरी नाराजी नाही!’

जिल्हा बँकेतील सत्तावाटपाच्या चर्चेत आपण सहभागी नव्हतो, असे स्पष्ट करताना गोरे यांनी शिवेंद्रराजे भोसले यांचा उल्लेख केला. सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

‘या निवडणुकीत महायुतीने मला मतदान केलेले नाही. माझी बिलकूल नाराजी नाही. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भाजपचा अध्यक्ष व्हावा, ही माझी भूमिका होती. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहिलो,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

‘आगे आगे देखो होता है क्या!’ सूचक इशाऱ्याने राजकीय चर्चांना उधाण

नवनिर्वाचित अध्यक्ष उदयसिंह पाटील उंडाळकर यांना शुभेच्छा देताना गोरे यांनी बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी ‘कोणतीही निवडणूक अंतिम नसते. आगे आगे देखो होता है क्या!’ असे सूचक विधान करून भविष्यातील राजकीय संघर्षाचे संकेतही दिले.

साताऱ्यातील सत्तासमीकरणांचा नवा अध्याय!

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीने महायुतीतील एकजूट आणि अंतर्गत मतभेद यांच्यातील सीमारेषा पुन्हा स्पष्ट केली आहे. भाजपकडे अध्यक्षपद जाणार, असा दावा असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्रित रणनीती आखून सत्तेचे गणित बदलले. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांची खेळी यशस्वी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जयकुमार गोरे यांनी सध्या नाराजी नसल्याचे सांगितले असले, तरी ‘आगे आगे देखो होता है क्या’ या त्यांच्या विधानाने साताऱ्याच्या राजकारणात पुढे कोणती नवी समीकरणे आकाराला येणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या एका निवडणुकीने महायुतीतील राजकीय ताकद, मैत्री आणि अंतर्गत संघर्षाचे नवे चित्र समोर आणले आहे.

✍️ *संपादक : किशोर आबिटकर*
*सिंहवाणी लाईव्ह न्यूज*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button