सिंहवाणी ब्रेकिंग.. पंढरपुरात काळाचा क्रूर घाला! विहीर खोदताना माती-दगडांचा ढिगारा कोसळला; चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू चार कुटुंबांचा आधार हरपला; आंबे गाव परिसरात शोककळा

सिंहवाणी ब्रेकिंग..
पंढरपुरात काळाचा क्रूर घाला! विहीर खोदताना माती-दगडांचा ढिगारा कोसळला; चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
चार कुटुंबांचा आधार हरपला; आंबे गाव परिसरात शोककळा
सिंहवाणी ब्युरो | महेश गायकवाड, सोलापूर
पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना अचानक माती आणि दगडांचा प्रचंड भराव कोसळून त्याखाली दबल्या गेल्याने चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोजंदारीवर कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चार कामगारांचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
३० फूट खोल विहिरीत काळाचा घाला!
मिळालेल्या माहितीनुसार, आंबे गावातील एका शेतामध्ये सुमारे ३० फूट खोल विहीर खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी विहिरीत काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर अचानक माती आणि मोठमोठे दगड कोसळले. काही क्षणांतच चारही कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील माती व दगडांचा ढिगारा बाजूला करून कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, या प्रयत्नांनंतरही चारही कामगारांचे प्राण वाचू शकले नाहीत.
चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
या दुर्घटनेत मंगेश मोरे आणि सिद्धेश्वर घाडगे (रा. रांजणी, ता. पंढरपूर) तसेच तानाजी घोडके आणि आबा घोडके (रा. अनवली, ता. पंढरपूर) या चार कामगारांचा मृत्यू झाला.
कष्टाच्या घामातून संसार उभा करणाऱ्या या कामगारांचा अचानक झालेला मृत्यू त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आघात ठरला आहे. घरातील कर्ते पुरुष गमावल्याने चार कुटुंबांचा आधारच हरपला आहे. या घटनेने आंबे, रांजणी आणि अनवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
विहीर खोदकामासारख्या जोखमीच्या कामांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कितपत केल्या जातात, हा प्रश्न या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खोल विहिरीत काम करताना माती व दगड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कामगारांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून दुःख व्यक्त
दरम्यान, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे सांगत त्यांनी मृत चारही कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे, तानाजी घोडके आणि आबा घोडके यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
एका विहिरीच्या खोदकामाने चार कुटुंबांचे आयुष्यच उद्ध्वस्त केले आहे. रोजीरोटीसाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता तरी गांभीर्याने घेतला जाणार का, हा या दुर्दैवी घटनेने उपस्थित केलेला महत्त्वाचा प्रश्न आहे.
—
⭕ विशेष चौकट ⭕
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले तीव्र दुःख
पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात शेतामध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू असताना माती व दगडांचा मोठा ढिगारा कोसळून चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे.
या दुर्घटनेत मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे (रा. रांजणी, ता. पंढरपूर) तसेच तानाजी घोडके आणि आबा घोडके (रा. अनवली, ता. पंढरपूर) या चार कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, या असह्य दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
✍️ संपादक : किशोर आबिटकर
सिंहवाणी लाईव्ह न्यूज
निर्भीड • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता!