क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी येडशीत अग्नितांडव! एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू; आठ जण गंभीर जखमी तीन पिढ्या आगीत भस्मसात; करडे कुटुंबावर काळाचा घाला, संपूर्ण गावावर शोककळा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी येडशीत अग्नितांडव!

एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू; आठ जण गंभीर जखमी

तीन पिढ्या आगीत भस्मसात; करडे कुटुंबावर काळाचा घाला, संपूर्ण गावावर शोककळा

सिंहवाणी ब्युरो | सोलापूर (महेश गायकवाड)
धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारी भीषण अग्निदुर्घटना घडली. येथील करडे कुटुंबाच्या किराणा दुकानाला आणि वरच्या मजल्यावरील घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून व गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण येडशी गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येडशी येथील उत्तम त्रिंबक करडे आणि त्यांचे कुटुंब किराणा दुकान व गिफ्ट शॉपीच्या वरच्या मजल्यावर वास्तव्यास होते. मध्यरात्री साधारण दोन ते अडीचच्या सुमारास दुकान आणि घराच्या परिसरात अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. घरात एकूण बारा जण असल्याची माहिती असून आगीच्या भीषण ज्वाळा आणि धुरामुळे अनेकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पहाटेपर्यंत आग धुमसत होती. मात्र, या दुर्घटनेत सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला. उर्वरित जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीन पिढ्यांचा दुर्दैवी अंत!

या दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करडे, चंद्रकला उत्तम करडे, गोविंद उत्तम करडे, ज्योती गोविंद करडे, गायत्री गोविंद करडे आणि सिद्धी गोविंद करडे या सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, पती-पत्नी आणि मुलींचा समावेश असल्याने तीन पिढ्यांवर एकाच वेळी काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली आहे.

सर्व मृतदेह धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या दिव्यामुळे किंवा पणतीमुळे आग लागली असावी, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अधिकृत तपासानंतरच आगीचे कारण स्पष्ट होणार आहे.

दिवाळीच्या आनंदावर दुःखाचे सावट!

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण! मात्र, येडशीतील करडे कुटुंबासाठी याच दिवाळीचा पहिलाच दिवस काळरात्र ठरला. ज्या घरात सणाचा आनंद असायला हवा होता, त्याच घरातून सहा जणांचे मृतदेह बाहेर पडल्याने गावातील प्रत्येकाचे मन सुन्न झाले आहे.

एका क्षणात हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. करडे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगामुळे येडशीसह संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

✍️ संपादक : किशोर आबिटकर
सिंहवाणी लाईव्ह न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button