#सोहोलीत कृषिदूतांचे उत्साहात स्वागत; आधुनिक शेतीचे धडे शेतकऱ्यांच्या बांधावर!

#सोहोलीत कृषिदूतांचे उत्साहात स्वागत; आधुनिक शेतीचे धडे शेतकऱ्यांच्या बांधावर!
ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन
कडेगाव : अमित डोळ
सोहोली (ता. कडेगाव) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न भारती विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, हिंगणगाव खुर्द येथील कृषिदूतांचे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत कृषिदूत ऋषिकेश शेळके, पृथ्वीराज शेंडगे, सुयश शिंदे, सोहम शिंदे, राजदीप सूर्यवंशी आणि युवराज पवार हे विद्यार्थी सोहोली येथे ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम तसेच कृषी औद्योगिक व ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम राबविणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार असून विविध पिकांवरील आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन आणि शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वेळोवेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थी आणि शेतकऱ्यांमधील ज्ञानाचा दुवा!
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादनक्षमता सुधारण्याच्या पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि ग्रामीण भागात कृषीविषयक जागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रामीण परिस्थितीचा अनुभव मिळणार असून शेतकऱ्यांनाही कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोगांची माहिती मिळणार आहे.
या कृषिदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अधिकराव जाधव, उपप्राचार्य डॉ. आर. एम. पवार, समन्वयक डॉ. चारुदत्त औताडे, कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. टी. माने आणि प्रा. ए. एच. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी सरपंच कु. प्रणाली सूर्यवंशी, उपसरपंच शहाजी मोहिते, उज्वला मोहिते, आबासाहेब मोहिते, लालासो आवताडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतीच्या पारंपरिक अनुभवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास ग्रामीण शेती अधिक सक्षम होऊ शकते. सोहोलीतील हा कृषिदूतांचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी ज्ञान आणि नव्या संधींचे दालन खुले करणारा ठरणार आहे.**
फोटो ओळ : सोहोली येथे कृषिदूतांचे स्वागत करताना सरपंच कु. प्रणाली सूर्यवंशी, उपसरपंच शहाजी मोहिते व ग्रामस्थ.
✍️ संपादक : किशोर आबिटकर