उपोषणाचा तिसरा दिवस; कृष्णात गोरे यांची प्रकृती खालावली, तरी अधिकारी बेपत्ता! इंडेनच्या स्वतंत्र वितरण व्यवस्थेसाठी आमरण उपोषण; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर भाजप नेते प्रवीणसिंह सावंत यांचा संतप्त सवाल – “अधिकारी नेमके कशात मशगुल आहेत?”

उपोषणाचा तिसरा दिवस; कृष्णात गोरे यांची प्रकृती खालावली, तरी अधिकारी बेपत्ता!
इंडेनच्या स्वतंत्र वितरण व्यवस्थेसाठी आमरण उपोषण; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर भाजप नेते प्रवीणसिंह सावंत यांचा संतप्त सवाल – “अधिकारी नेमके कशात मशगुल आहेत?”
सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
गारगोटी शहर आणि भुदरगड तालुक्यासाठी इंडेन गॅसची स्वतंत्र वितरण व्यवस्था सुरू करावी, या प्रमुख मागणीसाठी कृष्णात विठ्ठल गोरे यांनी गारगोटी येथील हुतात्मा चौकात सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सलग तीन दिवसांच्या उपोषणामुळे गोरे यांची प्रकृती खालावत असतानाही इंडेन कंपनीचे अधिकारी अथवा स्थानिक शासकीय प्रशासनातील अधिकारी उपोषणस्थळी फिरकले नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीणसिंह सावंत यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध केला.
उपोषणस्थळी बोलताना प्रवीणसिंह सावंत म्हणाले, “एका सामान्य ग्राहकाच्या प्रश्नासाठी कृष्णात गोरे गेले तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत आहे, तरीही इंडेनचे अधिकारी आणि स्थानिक शासकीय अधिकारी उपोषणस्थळी डोकावूनही पाहत नाहीत. हे अधिकारी नेमके कशात मशगुल आहेत? की दिवाळीची पाकिटे गोळा करण्यात व्यस्त आहेत?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दिवाळीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर असताना भुदरगड तालुक्यातील गॅस ग्राहकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज होती. इंडेन कंपनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून या प्रश्नावर तोडगा काढायला हवा होता. मात्र, कोणाच्या दबावाखाली या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला. आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्षानुवर्षांचा प्रश्न; ग्राहकांचा मनस्ताप कायम!
गारगोटी शहर आणि भुदरगड तालुक्यातील इंडेन गॅस ग्राहकांची वितरण व्यवस्था सध्या मुरगूड येथील एजन्सीकडे आहे. मात्र, गारगोटी व परिसरातील ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळणे, वितरणातील अनियमितता, एजन्सीशी संपर्क साधताना येणाऱ्या अडचणी आणि ग्राहकांशी होणारे कथित उद्धट वर्तन अशा अनेक तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून पुढे येत आहेत.
या प्रश्नावर यापूर्वीही अनेक आंदोलने, मोर्चे आणि पाठपुरावा झाला. त्यावेळी इंडेन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गारगोटीसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था देण्याचे आश्वासन दिले होते. तत्कालीन एजन्सी रद्द करून मुरगूड येथे नवीन एजन्सी नियुक्त करण्यात आली; मात्र गारगोटीचा स्वतंत्र वितरण व्यवस्थेचा प्रश्न कायम राहिला.
नवीन एजन्सीने सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात वितरण सेवा सुधारली होती. मात्र, कालांतराने पुन्हा ग्राहकांच्या तक्रारी वाढू लागल्या. वेळेवर सेवा न मिळणे, ग्राहकांशी उद्धट वर्तन आणि सिलेंडरच्या कथित काळाबाजाराबाबतच्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली.
“आश्वासन मिळाले, पण गारगोटीचा प्रश्न सुटलाच नाही!” – किशोर आबिटकर
यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांनी सांगितले की, गारगोटी आणि भुदरगड तालुक्यातील इंडेन ग्राहकांना योग्य सेवा मिळावी यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे. पूर्वीच्या एजन्सीच्या कारभाराविरोधात अनेक आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले होते. त्यावेळी इंडेन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गारगोटीसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, त्यानंतर तत्कालीन एजन्सी रद्द करून मुरगूड येथेच नवीन एजन्सी देण्यात आली. त्यामुळे एजन्सी बदलली, पण गारगोटीच्या ग्राहकांचा मूलभूत प्रश्न तसाच राहिला. नवीन एजन्सीकडून सुरुवातीला सेवा सुधारल्याचे दिसले; परंतु पुन्हा पूर्वीसारख्याच तक्रारी सुरू झाल्या. ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून तक्रारी आणि रोष वाढत असल्याचे आबिटकर यांनी नमूद केले.
आता तरी प्रशासन जागे होणार का?
गारगोटी आणि भुदरगड तालुक्यातील हजारो गॅस ग्राहकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित असलेला हा प्रश्न केवळ एका एजन्सीपुरता मर्यादित नाही. स्वतंत्र वितरण व्यवस्था, ग्राहकांना वेळेत सिलेंडर पुरवठा, तक्रारींचे त्वरित निवारण आणि ग्राहकांशी सन्मानपूर्वक वागणूक या मागण्या महत्त्वाच्या आहेत.
कृष्णात गोरे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला असून प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत इंडेन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून उपोषणकर्त्यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे.
आता प्रश्न एवढाच आहे की, एखाद्या ग्राहकाला आपल्या हक्काच्या गॅस सेवेसाठी प्राण पणाला लावून उपोषण करावे लागणार का? आणि प्रशासनाला जागे होण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार?