वेदगंगा नदीवरील पुलानजीक बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन! नांदोली–देऊळवाडी परिसरात भीतीचे वातावरण; रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन

वेदगंगा नदीवरील पुलानजीक बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन!
नांदोली–देऊळवाडी परिसरात भीतीचे वातावरण;
रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन
सिंहवाणी ब्युरो | पाटगाव
भुदरगड तालुक्यातील नांदोली–देऊळवाडी दरम्यान वेदगंगा नदीवरील पुलानजीक रात्रीच्या सुमारास बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद गोंधळी (रा. देऊळवाडी पैकी लिंगुरवाडी) हे रात्री दुचाकीवरून प्रवास करत असताना वेदगंगा नदीवरील पुलानजीक त्यांना बिबट्यासदृश प्राणी दिसला. अचानक समोर आलेला हा प्राणी पाहून ते घाबरले. त्याचवेळी त्यांच्या पाठोपाठ दुचाकीवरून येत असलेले पृथ्वीराज पाटील (रा. देऊळवाडी) यांनाही तोच प्राणी दिसला. त्यामुळे या घटनेला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.
या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून, संबंधित विभागाने तातडीने परिसराची पाहणी करून प्राण्याच्या हालचालींचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेची गरज!
वेदगंगा नदीकाठचा परिसर, तसेच लगतची झाडी आणि वनक्षेत्र यामुळे या भागात वन्यप्राण्यांचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देऊळवाडी, नांदोली, वेसर्डे आणि परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
शेतकरी, दूध उत्पादक, रात्रीच्या वेळी प्रवास करणारे दुचाकीस्वार आणि शेतात जाणाऱ्या नागरिकांनी शक्यतो एकट्याने प्रवास करणे टाळावे. रात्रीच्या वेळी नदीकाठच्या आणि वनक्षेत्रालगतच्या निर्जन भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
वन विभागाने तातडीने दखल घ्यावी!
बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाल्याची घटना केवळ अफवा म्हणून दुर्लक्षित न करता वन विभागाने प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. परिसरात गस्त वाढवणे, प्राण्याच्या पाऊलखुणा किंवा अन्य हालचालींची तपासणी करणे आणि ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
वन्यप्राण्यांचा अधिवास आणि मानवी वस्ती यांच्यातील वाढता संपर्क लक्षात घेता नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने जपली पाहिजे. संभाव्य धोका टाळण्यासाठी वन विभागाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.