अमेरिका-इस्रायल पाठोपाठ भारतातही सत्तांतर शक्य! राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली परिवर्तन घडविण्याची गरज; डॉ. सुभाष के. देसाई यांचे प्रतिपादन इंदिरा गांधी यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त गारगोटीत वृत्तपत्र प्रदर्शन

अमेरिका-इस्रायल पाठोपाठ भारतातही सत्तांतर शक्य!
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली परिवर्तन घडविण्याची गरज;
डॉ. सुभाष के. देसाई यांचे प्रतिपादन
इंदिरा गांधी यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त गारगोटीत वृत्तपत्र प्रदर्शन ; ४२ वर्षांपासून जतन केलेल्या दुर्मीळ ऐतिहासिक दस्तऐवजांचा अनमोल ठेवा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
किशोर आबिटकर | गारगोटी
आजच्या जागृत तरुण पिढीच्या सामर्थ्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये राजकीय परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिका आणि इस्रायलमध्येही सत्तांतराच्या शक्यतांची चर्चा होत असताना, त्याच पाठोपाठ भारतातही राजकीय परिवर्तन घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतातही सत्तांतर घडून आल्यास जागतिक शांतता, आर्थिक स्थैर्य, अन्नधान्याची उपलब्धता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आशादायक वातावरण निर्माण होऊ शकते. त्यासाठी देशातील जनतेने जात-धर्माचे भेद विसरून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाची भूमिका घेणे गरजेचे आहे, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष के. देसाई यांनी व्यक्त केले.
गारगोटी येथील शाहू वाचनालयाच्या सभागृहात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यान व स्मृतिप्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई होते.
डॉ. देसाई यांनी आपल्या व्याख्यानातून जागतिक राजकारणातील बदल, तरुण पिढीची वाढती राजकीय जाणीव आणि भारताच्या भविष्यातील राजकीय परिस्थिती यांचा परामर्श घेतला. सध्याच्या जागतिक परिस्थितीत केवळ सत्तेचे राजकारण न करता शांतता, आर्थिक समानता, अन्नसुरक्षा आणि पर्यावरण या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व देशाला आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतातील राजकीय परिवर्तनासाठी सामाजिक एकता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
४२ वर्षांच्या जतनातून उलगडला इंदिराजींच्या इतिहासाचा दुर्मीळ ठेवा!
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते निवृत्त अभियंता नंदकुमार मोरे यांनी गेली तब्बल ४२ वर्षे जतन केलेल्या इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याशी संबंधित दुर्मीळ वृत्तपत्रांचे प्रदर्शन!
इंदिरा गांधी यांच्या हत्येपूर्वी आणि हत्येनंतर देशभरातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या, तत्कालीन राजकीय घडामोडींचे वृत्तांकन, विविध ग्रंथ, इंदिराजींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग टिपणारी दुर्मीळ छायाचित्रे अशा ऐतिहासिक साहित्याचा खजिना या प्रदर्शनात मांडण्यात आला होता.
एका ऐतिहासिक कालखंडाचे साक्षीदार असलेल्या या वृत्तपत्रांमधून इंदिरा गांधी यांच्या राजकीय जीवनाचा, त्यांच्या कार्याचा आणि देशाच्या तत्कालीन परिस्थितीचा जिवंत इतिहास नव्या पिढीसमोर उलगडला. केवळ कागदपत्रांचे प्रदर्शन न राहता, पत्रकारितेच्या माध्यमातून इतिहास जतन करण्याचा एक अनोखा प्रयत्न म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या दुर्मीळ प्रदर्शनाचा लाभ गारगोटी परिसरातील नागरिकांसह श्री मौनी विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घेतला. जुन्या वृत्तपत्रांमधील बातम्या, तत्कालीन मथळे आणि छायाचित्रे पाहताना अनेकांनी इतिहासातील आठवणींना उजाळा दिला. तरुण विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे देशाच्या राजकीय इतिहासाची प्रत्यक्ष ओळख करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.
प्रारंभी नंदकुमार मोरे यांनी प्रदर्शनामागील भूमिका आणि गेल्या ४२ वर्षांच्या संग्रह जतन प्रवासाची माहिती दिली. शाहू वाचनालयाचे कार्यवाह टी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर, प्रकाश देसाई, आनंद चव्हाण, रणजित देसाई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
एका बाजूला इंदिरा गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देणारे ऐतिहासिक वृत्तपत्र प्रदर्शन आणि दुसऱ्या बाजूला देशाच्या वर्तमान व भविष्यकालीन राजकारणावर भाष्य करणारे विचारमंथन, अशा दुहेरी स्वरूपामुळे गारगोटीतील हा स्मृतिदिनाचा कार्यक्रम लक्षवेधी ठरला.
