ताज्या घडामोडीदेश विदेशविशेष

दिल्ली पोलीस विरुद्ध दिल्ली पोलीस! खाकी वर्दीचा अभूतपूर्व विद्रोह; पोलीस मुख्यालयातच ठिय्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर कर्मचाऱ्यांचा संताप!

दिल्ली पोलीस विरुद्ध दिल्ली पोलीस! खाकी वर्दीचा अभूतपूर्व विद्रोह; पोलीस मुख्यालयातच ठिय्या,

वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर कर्मचाऱ्यांचा संताप!

शिस्तीचा धाक दाखवणारे पोलीसच उतरले आंदोलनाच्या मैदानात; १०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा एल्गार, पोलीस आयुक्तांना घ्यावी लागली तातडीची बैठक; भारतीय पोलीस व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

सिंहवाणी ब्युरो | नवी दिल्ली
देशाची राजधानी, कायदा-सुव्यवस्थेचे केंद्र आणि देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या पोलीस दलांपैकी एक असलेल्या दिल्ली पोलिसांच्या इतिहासात आज एक विलक्षण आणि अस्वस्थ करणारी घटना घडली. कायद्याचा धाक दाखवणारे, आंदोलनांना शिस्त लावणारे आणि रस्त्यावर उतरलेल्या जमावाला पांगवणारे पोलीस कर्मचारीच आज आपल्या मागण्यांसाठी स्वतःच्याच पोलीस मुख्यालयाबाहेर रस्त्यावर उतरले! एवढेच नव्हे, तर आंदोलनाची धग मुख्यालयाच्या आवारात पोहोचली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घोषणाबाजी झाली. अखेर पोलीस आयुक्तांना तातडीची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागले.

‘दिल्ली पोलीस विरुद्ध दिल्ली पोलीस’ असे चित्र निर्माण करणारी ही घटना केवळ एका बदलीचा वाद नाही; तर पोलीस दलातील अंतर्गत असंतोषाचा उघड झालेला स्फोट आहे.

नेमका वाद काय? वकिलांच्या आंदोलनानंतर दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या!

या संघर्षाची ठिणगी २३ ऑक्टोबर रोजी शाहदरा पोलीस ठाण्यात पडली. तेथे पोलीस कर्मचारी आणि वकिलांमध्ये झालेल्या संघर्षात ललित बन्सल या वकिलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर वकिलांनी संबंधित पोलिसांविरोधात कारवाईची मागणी करीत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.

वकिलांच्या आंदोलनाची दखल घेत २८ ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलीस प्रशासनाने एसीपी मनस्वी वशिष्ठ आणि शाहदरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण कुमार यांच्या बदल्या केल्या. त्यानंतर वकिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.

मात्र, या बदल्यांनी पोलीस दलातच असंतोषाची ठिणगी पडली. आपल्या सहकाऱ्यांवर एकतर्फी कारवाई झाल्याचा आरोप करीत पोलिसांच्या एका गटाने त्यांना पुन्हा पूर्वीच्या पदावर नियुक्त करण्याची मागणी केली.

स्वतःच्याच मुख्यालयाला पोलिसांचा घेराव!

सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ८० ते १०० पोलीस कर्मचारी दिल्ली पोलीस मुख्यालयाच्या गेट क्रमांक एकबाहेर जमा झाले. हातात फलक, घोषणाबाजी आणि आपल्या सहकाऱ्यांच्या समर्थनार्थ उघड भूमिका घेत त्यांनी आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे, बदली झालेले एसीपी मनस्वी वशिष्ठही या आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी त्यांच्याच सहकाऱ्यांना तैनात करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. डीसीपी सचिन शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना शिस्तीची आठवण करून देत, ‘तुम्ही आंदोलकांसारखे वागू नका’ अशी समज दिली. मात्र, कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसोबत थेट संवाद साधण्याची मागणी सोडली नाही.

प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. आंदोलनकर्ते मुख्यालयाच्या आवारातही पोहोचले. तेथे ठिय्या आंदोलन आणि घोषणाबाजी सुरू झाली. वेगवेगळ्या जिल्ह्यांतील कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि विशेष पोलीस आयुक्तांना तातडीची बैठक घ्यावी लागली.

पोलीस आयुक्तांसमोरच कर्मचाऱ्यांचा संताप!

मुख्यालयातील आदर्श सभागृहात झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी आणि मागण्या मांडल्या. माध्यमांना मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. एसीपी वशिष्ठ यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्याचे वृत्त आहे. वकिलांविरोधात दाखल गुन्हे मागे घेऊ नयेत, बार कौन्सिलच्या एका सदस्याचे नाव प्रकरणातून वगळू नये आणि आंदोलनात सहभागी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये, या मागण्यांचा त्यात समावेश होता.

कारवाई करायचीच असेल तर ती केवळ आपल्यावर करावी, अशी भूमिका एसीपी वशिष्ठ यांनी घेतल्याचेही वृत्त आहे. पहिल्या चर्चेत तोडगा निघाला नाही. त्यानंतर आंदोलनकर्ते सभागृहातून बाहेर पडले. पुढील चर्चेची शक्यता व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button