स्वतंत्र इंडेन गॅस वितरणाचा मार्ग मोकळा होणार? उपविभागीय अधिकाऱ्यांचा सकारात्मक अहवाल; गारगोटीत स्वतंत्र वितरक नियुक्त करण्याची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे शिफारस

स्वतंत्र इंडेन गॅस वितरणाचा मार्ग मोकळा होणार?
उपविभागीय अधिकाऱ्यांचा सकारात्मक अहवाल; गारगोटीत स्वतंत्र वितरक नियुक्त करण्याची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे शिफारस
कृष्णात गोरे यांच्या उपोषणाला प्रशासकीय प्रतिसाद; मात्र प्रत्यक्ष नियुक्ती आणि सिलेंडर पुरवठा सुरळीत होईपर्यंत प्रश्न कायम!
सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
गारगोटी शहरासह संपूर्ण भुदरगड तालुक्यातील इंडेन गॅस ग्राहकांसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था सुरू करण्याच्या मागणीला आता प्रशासकीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. भुदरगडचे तहसीलदार यांच्या अहवालानंतर आजरा-भुदरगड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हरेश सुळ यांनी गारगोटी येथे स्वतंत्र इंडेन गॅस वितरक नियुक्त करण्याची आवश्यकता स्पष्ट करून जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गारगोटीच्या स्वतंत्र गॅस वितरण व्यवस्थेच्या मागणीला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
मुरगूडच्या एजन्सीविरोधात तक्रारी; प्रशासनाकडून नोटीस
भुदरगड तालुक्यातील इंडेन गॅस वितरणाची जबाबदारी सध्या मुरगूड येथील बाळूमामा इंडेन गॅस एजन्सीकडे आहे. मात्र, या एजन्सीच्या कामकाजाबाबत ग्राहकांकडून वारंवार तक्रारी होत असल्याचे प्रशासकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. गॅस सिलेंडरचा अपुरा पुरवठा, वितरणातील अडचणी आणि ग्राहकांच्या तक्रारींमुळे यापूर्वीही आंदोलने व मोर्चे काढण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर कृष्णात विठ्ठल गोरे यांनी एजन्सीच्या कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी गारगोटी येथे उपोषण सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार भुदरगड यांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी बाळूमामा इंडेन गॅस एजन्सी, मुरगूडचे मालक यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.
एजन्सीविरोधात कारवाईचा स्वतंत्र अहवाल
संबंधित एजन्सीविरोधात योग्य ती कारवाई करण्यासाठी स्वतंत्र अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी हरेश सुळ यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर भुदरगड तालुक्याची भौगोलिक व्याप्ती आणि ग्राहकांची संख्या लक्षात घेता सध्याच्या एजन्सीकडून होणारा सिलेंडर पुरवठा अपुरा पडत असल्याचेही अहवालात नमूद आहे.
यामुळे वारंवार वाद आणि तक्रारींचे प्रसंग उद्भवत असून भुदरगड तालुक्यासाठी गारगोटी येथे स्वतंत्र इंडेन गॅस वितरक नियुक्त करणे आवश्यक असल्याची ठोस भूमिका प्रशासनाने मांडली आहे.
आश्वासन मिळाले, पण गारगोटीचा प्रश्न सुटलाच नाही! – किशोर आबिटकर
यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांनी सांगितले की, गारगोटी आणि भुदरगड तालुक्यातील इंडेन गॅस ग्राहकांना योग्य सेवा मिळावी यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे. पूर्वीच्या एजन्सीच्या कारभाराविरोधात अनेक आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले होते. त्यावेळी इंडेन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गारगोटीसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, त्यानंतर तत्कालीन एजन्सी रद्द करून मुरगूड येथेच नवीन एजन्सी देण्यात आली. त्यामुळे एजन्सी बदलली, पण गारगोटीच्या ग्राहकांचा मूलभूत प्रश्न तसाच राहिला. नवीन एजन्सीकडून सुरुवातीला सेवा सुधारल्याचे दिसले; परंतु पुन्हा पूर्वीसारख्याच तक्रारी सुरू झाल्या. ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून तक्रारी आणि रोष वाढत असल्याचे आबिटकर यांनी नमूद केले.
आता तरी प्रशासन जागे होणार का? – प्रवीणसिंह सावंत
गारगोटी आणि भुदरगड तालुक्यातील हजारो गॅस ग्राहकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित असलेला हा प्रश्न केवळ एका एजन्सीपुरता मर्यादित नाही. स्वतंत्र वितरण व्यवस्था, ग्राहकांना वेळेत सिलेंडर पुरवठा, तक्रारींचे त्वरित निवारण आणि ग्राहकांशी सन्मानपूर्वक वागणूक या मागण्या महत्त्वाच्या आहेत, असे भाजपाचे नेते प्रवीणसिंह सावंत यांनी म्हटले आहे.
उपोषण संपविण्याचे आवाहन; आता निर्णयाकडे लक्ष
उपविभागीय अधिकारी हरेश सुळ यांनी कृष्णात गोरे यांना पाठविलेल्या पत्रात त्यांच्या मागणीनुसार भुदरगड तालुक्यासाठी गारगोटी येथे स्वतंत्र इंडेन गॅस वितरक नियुक्त करण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांना कळविण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच सुरू असलेले उपोषण समाप्त करण्याचे आवाहनही केले.
मात्र, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून पुढे कोणता निर्णय घेतला जातो, इंडेन कंपनीकडून स्वतंत्र वितरक नियुक्तीला कधी मान्यता मिळते आणि प्रत्यक्ष वितरण व्यवस्था कधी सुरू होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रशासनाने स्वतंत्र वितरण व्यवस्थेची गरज मान्य केली असली, तरी केवळ अहवाल आणि पत्रव्यवहारावर ग्राहकांचे समाधान होणार नाही. प्रत्यक्ष स्वतंत्र एजन्सी सुरू होणे, वेळेत सिलेंडर उपलब्ध होणे आणि ग्राहकांच्या तक्रारींचे कायमस्वरूपी निराकरण होणे आवश्यक आहे.
आता गारगोटीला स्वतंत्र इंडेन गॅस वितरक मिळणार की पुन्हा एकदा आश्वासनांवरच समाधान मानावे लागणार? हा प्रश्न भुदरगड तालुक्यातील हजारो गॅस ग्राहकांसमोर कायम आहे.
✍️ संपादक : किशोर आबिटकर सिंहवाणी लाईव्ह न्यूज
==========