जिल्हाताज्या घडामोडी

साहित्याने अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवावा – डॉ. श्यामसुंदर मिरजकर दयवाराचे दिवस’ ललितगद्यसंग्रहाचा कोनवडे येथे दिमाखदार प्रकाशन सोहळा; साहित्यिक, मान्यवरांची उपस्थिती

साहित्याने अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवावा – डॉ. श्यामसुंदर मिरजकर

दयवाराचे दिवस’ ललितगद्यसंग्रहाचा कोनवडे येथे दिमाखदार प्रकाशन सोहळा; साहित्यिक, मान्यवरांची उपस्थिती

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
समाजातील विषमता, अन्याय, अंधश्रद्धा आणि माणसामाणसांतील वाढता दुरावा यांना प्रश्न विचारण्याचे धाडस साहित्याने दाखवले पाहिजे. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाच्या विवेकाला जागे करणारे, व्यवस्थेला आत्मपरीक्षण करायला लावणारे आणि माणसाला माणुसकीची जाणीव करून देणारे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, वैचारिक मतभिन्नता आणि सहिष्णुतेची कसोटी लागणाऱ्या आजच्या वातावरणात लेखकाने कोणत्याही दबावापुढे झुकता कामा नये. लेखणीने कोणाची मर्जी राखण्यापेक्षा सत्याची बाजू घेतली पाहिजे. द्वेषाच्या वातावरणात विवेक, समता, बंधुता आणि सामाजिक सलोख्याची पेरणी करणारे साहित्य निर्माण होणे ही काळाची गरज आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. श्यामसुंदर मिरजकर (इस्लामपूर) यांनी केले.

गावशिवार साहित्य परिवार आणि पुस्तक मार्केट पब्लिकेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र हिरा शिवाजी गुरव (पाचवडे) यांच्या **‘दयवाराचे दिवस’** या ललितगद्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कोनवडे (ता. भुदरगड) येथील सदामंगलम हॉलमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिरजकर बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात संविधानास वंदन करून तसेच फुलझाडांना पाणी घालून करण्यात आली. साहित्यिक सोहळ्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा विधायक संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे म्हणाले की, कोल्हापुरी बोलीभाषेचा अस्सल बाज, ग्रामीण जीवनातील अनुभवविश्व, मातीशी असलेले नाते आणि लोकजीवनातील सांस्कृतिक वैशिष्ट्ये साहित्याच्या माध्यमातून जतन होणे आवश्यक आहे. ‘दयवाराचे दिवस’ या पुस्तकातून कोल्हापुरी बोलीतील शब्दसंपदेचा आणि ग्रामीण जीवनाचा अस्सल आविष्कार अनुभवायला मिळतो.

ज्येष्ठ कवी प्रा. एकनाथ पाटील यांनी साहित्याचे महत्त्व अधोरेखित करताना, साहित्य हे केवळ शब्दांचे संकलन नसून एका समाजाचे जगणे, संघर्ष, संवेदना आणि संस्कृती यांचे दस्तऐवजीकरण असते, असे मत व्यक्त केले.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रशेखर कांबळे, राजन कोनवडेकर आदींनी मनोगते व्यक्त केली.

‘दयवाराचे दिवस’ या पुस्तकाचे लेखक रवींद्र गुरव यांचा सपत्नीक तसेच त्यांच्या आई-वडिलांचाही गावशिवार साहित्य परिवाराच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. उपशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे आणि प्रा. एकनाथ पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक नवनाथ गोरे, प्रा. चंद्रशेखर कांबळे आणि रवींद्र कामत यांचाही लेखक रवींद्र रेखा गुरव, डॉ. श्यामसुंदर मिरजकर आणि कवीवर्य गोविंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यास साहित्यिक मारुती मांगोरे, ‘झुंड’कार दत्ता मोरसे, रवींद्र रेखा गुरव, राम मगदूम, आर. वाय. पाटील, संगीतकार शिवराज पाटील, विश्वंभर कुलकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष मेंगाणे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष पाटील, बाबासाहेब देसाई, सातापा गुरव, निवृत्ती बामणे, सचिन दुधाळे, किरण चव्हाण, सर्जेराव माळवी, महेश कुंभार, नरेंद्र पाटील, चित्रकार बाळासाहेब परितकर यांच्यासह साहित्यप्रेमी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शिवाजी देसाई यांनी केले, तर कवीवर्य गोविंद पाटील यांनी आभार मानले.

✍️ संपादक : किशोर आबिटकर
सिंहवाणी लाईव्ह न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button