ताज्या घडामोडी

गारगोटीत ‘वृंदावन’चा अत्याधुनिक दंतसेवा विभाग सुरू! आधुनिक यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ दंतचिकित्सकांच्या सेवेमुळे भुदरगडवासीयांना मिळणार दर्जेदार उपचारांची सुविधा

गारगोटीत ‘वृंदावन’चा अत्याधुनिक दंतसेवा विभाग सुरू!

आधुनिक यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ दंतचिकित्सकांच्या सेवेमुळे भुदरगडवासीयांना मिळणार दर्जेदार उपचारांची सुविधा

सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
भुदरगड तालुक्यातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार दंतचिकित्सा सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गारगोटी येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक दंतसेवा विभागाचा शुभारंभ शनिवार (दि. १४ नोव्हेंबर) रोजी करण्यात आला. डॉ. जास्वंदा राजे गोरे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या विभागामुळे आता दातांच्या विविध आजारांवरील उपचारांसाठी नागरिकांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार आहे.

वृंदावन हॉस्पिटलचा हा नवीन दंतसेवा विभाग आधुनिक उपकरणे, अद्ययावत यंत्रसामग्री आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांनी सज्ज करण्यात आला आहे. दंतविकारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा येथे उपलब्ध होणार आहे. डॉ. जास्वंदा राजे गोरे यांनी यापूर्वी मुंबई येथे दंतचिकित्सा दवाखाना चालविल्याचा अनुभव असून, त्या अनुभवाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ आता भुदरगड तालुक्यातील रुग्णांना मिळणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दातांच्या उपचारांसाठी कोल्हापूर, मुंबईसारख्या शहरांवर अवलंबून राहावे लागते. अनेकदा वेळ, प्रवास आणि खर्च यामुळे उपचारांकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत गारगोटीतच आधुनिक दंतचिकित्सा सुविधा उपलब्ध होणे ही तालुक्याच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.

या शुभारंभप्रसंगी डॉ. अमर पाटील, संभाजी गिरी, अनमोल कोठाडिया, ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर, डॉ. सुभाष के. देसाई, जयश्री चव्हाण, कॉ सम्राट मोरे, कृष्णा ठाकरे, अरुण हणफोडे, अविनाश शिंदे, मानसिंग देसाई, एस. पी. पाटील, राजेंद्र यादव, मोहन गिरी, किरण आरेकर, कृष्णात साठे, विनायक जाधव, डॉ. पांडुरंग गिरी, डॉ. शिवाजी झोरे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वृंदावन हॉस्पिटलचा लौकिक दिवसेंदिवस वाढत असून, आरोग्यसेवेच्या क्षेत्रात रुग्णांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न समाधानकारक असल्याचे मत डॉ. शिवाजी झोरे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मानसिंग देसाई यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या आठवणींवर आधारित पुस्तक उपस्थित मान्यवरांना भेट देऊन ऐतिहासिक स्मृतींना उजाळा दिला.

गारगोटीच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय!

वृंदावन हॉस्पिटलमध्ये सुरू झालेला हा अत्याधुनिक दंतसेवा विभाग भुदरगड तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण भर ठरणार आहे. स्थानिक पातळीवर आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांतून स्वागत होत आहे.

✍️ संपादक : किशोर आबिटकर
सिंहवाणी लाईव्ह न्यूज
निर्भीड • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button