बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त वसमत रेल्वे स्थानकावर अभिवादन! भव्य व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शन; प्रबोधनपर पत्रकांचे रेल्वे प्रवाशांना वितरण

बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त वसमत रेल्वे स्थानकावर अभिवादन!
भव्य व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शन; प्रबोधनपर पत्रकांचे रेल्वे प्रवाशांना वितरण
*सिंहवाणी ब्युरो / वसमत
जागतिक आद्य स्वातंत्र्यसेनानी आणि आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान धरती आबा बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त वसमत रेल्वे स्थानकावर अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्ताने व्यसनमुक्त भारत अभियानांतर्गत भव्य व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शन आयोजित करून रेल्वे प्रवाशांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात आला. या उपक्रमाला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील वसमत रेल्वे स्थानकावर रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. नशामुक्त भारत अभियान समिती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल, स्टेशन मास्तर आशिष मोरे, रेल्वे तिकीट पर्यवेक्षक देवानंद गायकवाड, मिलिंद आळणे, अॅड. गोरखनाथ आव्हाड, गुरुनाथ गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बिरसा मुंडा यांच्या विचारांची आजच्या तरुणाईला गरज!
यावेळी मार्गदर्शन करताना नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा आणि विचारांचा आजच्या पिढीने आदर्श घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. तरुणांमध्ये वैचारिक जागृती निर्माण करून त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रबोधनात्मक उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
स्टेशन मास्तर आशिष मोरे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत आपले विचार व्यक्त केले.
रेल्वे स्थानकावर व्यसनमुक्तीचा जागर!
कार्यक्रमाच्या निमित्ताने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रकाशित व्यसनमुक्तीविषयक पोस्टर आणि चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि सामाजिक आरोग्य याविषयी माहिती देणाऱ्या प्रबोधनपर पत्रकांचे रेल्वे प्रवाशांना वितरण करण्यात आले.
रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रथमच अशा प्रकारचा प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आल्याने प्रवाशांमध्ये कुतूहल निर्माण झाले. अनेक प्रवाशांनी प्रदर्शनाची पाहणी करून उपक्रमाची माहिती घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद आळणे यांनी केले, तर गुरुनाथ गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बिरसा मुंडा यांच्या संघर्षाचा आदर्श आणि व्यसनमुक्त समाजाचा संकल्प या दोन्ही विचारांची सांगड घालत वसमत रेल्वे स्थानकावर राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
✍️ संपादक : किशोर आबिटकर
*सिंहवाणी लाईव्ह न्यूज*