सह्याद्रीच्या रक्षणासाठी आता एल्गार! पारगड ते रायगड जागरण यात्रा निघणार; पर्यावरणप्रेमींसह सजग नागरिकांना एकजुटीचे आवाहन! पंप स्टोरेज प्रकल्प आणि शक्तिपीठ महामार्गाच्या संभाव्य पर्यावरणीय परिणामांविरोधात जनजागृती; ३० नोव्हेंबरला पारगडावरून प्रारंभ, २ डिसेंबरला पन्हाळगडावर पहिल्या टप्प्याची सांगता

सह्याद्रीच्या रक्षणासाठी आता एल्गार! पारगड ते रायगड जागरण यात्रा निघणार;
पर्यावरणप्रेमींसह सजग नागरिकांना एकजुटीचे आवाहन!
पंप स्टोरेज प्रकल्प आणि शक्तिपीठ महामार्गाच्या संभाव्य पर्यावरणीय परिणामांविरोधात जनजागृती; ३० नोव्हेंबरला पारगडावरून प्रारंभ, २ डिसेंबरला पन्हाळगडावर पहिल्या टप्प्याची सांगता
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
सह्याद्रीच्या समृद्ध जंगलांचे, जैवविविधतेचे, जलस्रोतांचे आणि निसर्गसंपदेचे रक्षण करण्यासाठी आता पश्चिम महाराष्ट्रात जनजागृतीची व्यापक चळवळ उभी करण्याचा निर्धार पर्यावरणप्रेमी आणि सह्याद्री वाचवा चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे. भीमाशंकर, तारळीपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या पाच पंप स्टोरेज प्रकल्पांमुळे सुमारे दीड ते दोन हजार हेक्टर समृद्ध जंगल बाधित होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर आजरा, चंदगड आणि सिंधुदुर्गातील दोडामार्गसारख्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील अतिसंवेदनशील भागातून शक्तिपीठ महामार्ग नेण्याच्या विचारालाही विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर **’सह्याद्रीच्या रक्षणासाठी पारगड ते रायगड जागरण यात्रा’** आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेच्या भुदरगड तालुक्यातील नियोजनासाठी गारगोटी येथील भुदरगड तालुका सहकारी संघच्या सभागृहात आयोजित झालेल्या बैठकीत ही माहिती कॉ सम्राट मोरे यांनी दिली
या यात्रेचा पहिला टप्पा पारगड (ता. चंदगड) ते पन्हाळगड असा असून सोमवार दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता पारगडावरून यात्रेचा प्रारंभ होणार आहे. बुधवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पन्हाळगड येथे जाहीर सभेने या पहिल्या टप्प्याची सांगता होणार आहे. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत यात्रेचा प्रारंभ होणार असून राज्यभरातील पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, शेतकरी, युवक-युवती आणि सजग नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सह्याद्रीवर घाला म्हणजे मानवी जीवनावरच संकट!
सह्याद्री अर्थात पश्चिम घाट हा दक्षिण भारताचा महत्त्वाचा जलस्रोत असून जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील अत्यंत समृद्ध प्रदेशांपैकी एक आहे. असंख्य दुर्मिळ पशू-पक्षी, प्राणी आणि वनस्पतींचा अधिवास या परिसरात आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी दक्षिण भारतातील शेती, मानवी जीवन आणि पशुपक्ष्यांची तहान भागवते.
मात्र विकासाच्या नावाखाली पंप स्टोरेज प्रकल्प, शक्तिपीठ महामार्ग यांसारखे प्रकल्प संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रावर लादले जात असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. जंगलतोड झाली तर पावसाचे चक्र, भूजलसाठे, नद्यांचे प्रवाह आणि शेती यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आधीच पर्जन्यमानात बदल जाणवत असताना वनसंपदेचा ऱ्हास झाल्यास त्याची झळ संपूर्ण समाजाला सोसावी लागेल, अशी भूमिका या चळवळीतील कार्यकर्त्यांनी मांडली आहे.
याशिवाय शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी उद्योग आणि ऊर्जा प्रकल्पांकडे वळवले गेले तर शेती आणि ग्रामीण जीवनासमोर पाण्याचे मोठे संकट उभे राहू शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे. हा प्रश्न केवळ जंगल किंवा पर्यावरणापुरता मर्यादित नसून येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्याशी जोडलेला आहे.
छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि सह्याद्रीचे नाते जपण्याचा निर्धार
सह्याद्रीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास घडला. या डोंगररांगा, गड-किल्ले, जंगल आणि नैसर्गिक भौगोलिक रचना ही महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे. निसर्गाचा ऱ्हास होत असताना या ऐतिहासिक वारशाचेही अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सह्याद्रीचे संरक्षण म्हणजे केवळ पर्यावरणाचे संरक्षण नव्हे, तर महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, जलसंपदा आणि भावी पिढ्यांचे भविष्य जपण्याची जबाबदारी असल्याची भावना यात्रेच्या आयोजकांनी व्यक्त केली आहे.
संपत देसाई : सह्याद्रीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे!
याबाबत सह्याद्री वाचवा चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते संपत देसाई यांनी पर्यावरणीय प्रश्नावर व्यापक जनजागृती आणि समाजातील सर्व घटकांच्या एकजुटीची गरज व्यक्त केली. ग्रीन एनर्जी प्रकल्प राबवताना महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जैवविविधतेचा आणि पाण्याचा ऱ्हास होता कामा नये. अशा प्रयत्नांना समाजातील सर्व स्तरांतून एकजुटीने विरोध झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सह्याद्रीवर उगम पावणाऱ्या नद्यांमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे दक्षिण भारतातील मोठ्या लोकसंख्येची, शेतीची तसेच पशुपक्ष्यांची तहान भागते. वनसंपदा उद्ध्वस्त झाली तर आधीच कमी होत असलेल्या पावसावर आणखी विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याची झळ सर्वांनाच बसणार असल्याने सह्याद्री वाचविण्याचा लढा व्यापक झाला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
के. पी. पाटील यांचा लढ्याला पाठिंबा
या बैठकीत बोलताना माजी आमदार आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांनीही या जनआंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. जनतेच्या या लढ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आम्ही एकजुटीने उभे राहणार आहोत. जिल्ह्यातील जंगल, जमीन आणि पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तीन दिवसांचा जागरण यात्रेचा मार्ग
पहिला दिवस – सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६
सकाळी १० वाजता पारगडावरून यात्रेचा प्रारंभ. त्यानंतर हेरे मार्गे चंदगड येथे आगमन व सभा. पुढे धामापूर-कुरणी येथे सभा व भोजन, त्यानंतर आजरा येथे मुक्काम आणि जाहीर सभा.
दुसरा दिवस – मंगळवार, १ डिसेंबर २०२६
आजरा येथून पेरणोली, देवकांडगाव, नवले, पाटगाव आणि कडगाव येथे यात्रा पोहोचणार असून कडगाव येथे सभा होणार आहे. त्यानंतर शेळोली, मडूर मार्गे गारगोटी येथे आगमन होईल. गारगोटी येथेही जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तिसरा दिवस – बुधवार, २ डिसेंबर २०२६
गारगोटी येथून मुदाळ तिठ्ठा, सरवडे, धामोड आणि आसुर्ले मार्गे यात्रा पन्हाळगडावर पोहोचणार आहे. सायंकाळी ठीक ५ वाजता पन्हाळगड येथे जाहीर सभेने पहिल्या टप्प्याची सांगता होणार आहे.
सह्याद्री वाचविण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरावे!
सह्याद्रीचे जंगल, नद्या, डोंगर, जैवविविधता आणि जलसंपदा ही केवळ एका जिल्ह्याची किंवा राज्याची संपत्ती नाही. ती संपूर्ण देशाच्या पर्यावरणीय संतुलनाचा महत्त्वाचा आधार आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाची अपरिमित हानी होणार असेल, तर त्या विकासाच्या दिशेचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे. ऊर्जा निर्मिती आणि पायाभूत सुविधा विकासाला विरोध करण्यापेक्षा पर्यावरणाचा समतोल राखून विकास करण्याची मागणी या जागरण यात्रेच्या माध्यमातून मांडली जाणार आहे.
‘आज सह्याद्री वाचवला तरच उद्याचे पाणी, जंगल, शेती आणि जीवन वाचेल!’ हा संदेश घेऊन पारगड ते रायगड जागरण यात्रेचा संकल्प करण्यात आला आहे. या लढ्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, पत्रकार, युवक-युवती आणि पर्यावरणप्रेमींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बैठकीस सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पंडितराव केणे, गोकुळचे संचालक राहुल देसाई, गारगोटी चे सरपंच प्रकाश वास्कर, काँ. संपतराव देसाई कॉम्रेड सम्राट मोरे, के ना पाटील काशिनाथ देसाई, संदीप देसाई, के के भारतीय, कुंडलिक गुरव, धनराज चव्हाण, शिवराज देसाई, आनंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते
✍️ संपादक : किशोर आबिटकर
सिंहवाणी लाईव्ह न्यूज