जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवरायांच्या अवमानाचा निषेध; श्रीक्षेत्र माहूर उद्या बंद! टिपू सुलतान जयंतीच्या मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणे वाजविल्याचा आरोप; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट, पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह!

छत्रपती शिवरायांच्या अवमानाचा निषेध; श्रीक्षेत्र माहूर उद्या बंद!

टिपू सुलतान जयंतीच्या मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणे वाजविल्याचा आरोप; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट, पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह!

सिंहवाणी ब्युरो | संजय घोगरे श्रीक्षेत्र माहूर
नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर येथे टिपू सुलतान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह गाणे डीजेवर वाजविण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकाराचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी माहूर शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान जयंतीनिमित्त माहूर शहरात हजारो नागरिकांच्या सहभागातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सुमारे १५ डीजे सहभागी झाले होते. मात्र, या मिरवणुकीदरम्यान काही डीजेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह स्वरूपाचे गाणे वाजविण्यात आल्याचा आरोप होत आहे. संबंधित गाण्याचे रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वाबाबत अवमानकारक मजकूर किंवा गाणी सार्वजनिक ठिकाणी वाजविण्याचा प्रकार घडत असेल, तर तो केवळ शिवप्रेमींच्या भावनांचा प्रश्न नसून सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित गंभीर विषय ठरतो.

पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्न!

मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. असे असताना कथित आक्षेपार्ह गाणे वाजविले जात असताना तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई का झाली नाही? संबंधित डीजे चालकांना त्याचवेळी रोखण्यात आले का नाही? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे, शनिवार दुपारपर्यंत या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली नसल्याने नागरिकांमधील नाराजी अधिक वाढली आहे. उपलब्ध व्हिडिओ आणि ध्वनिचित्रफितींची तपासणी करून संबंधितांची ओळख पटवावी, निष्पक्ष चौकशी करावी आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

माहूर बंदचे आवाहन; शांततेत निषेध नोंदविण्याचे आवाहन

या घटनेच्या निषेधार्थ रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी माहूर शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी शांततेच्या मार्गाने बंदमध्ये सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात केवळ गाणे वाजविणाऱ्या संबंधित व्यक्तींचीच नव्हे, तर मिरवणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलीस यंत्रणेच्या भूमिकेचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

प्रशासनासमोर आता कसोटी!

माहूरमधील या घटनेतून सार्वजनिक मिरवणुकांमधील ध्वनिक्षेपकांचा वापर, आक्षेपार्ह मजकुरावर नियंत्रण आणि पोलिसांच्या तत्परतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखणे, सामाजिक सलोखा टिकविणे आणि कायद्याचे राज्य अबाधित ठेवणे ही प्रशासनाची तसेच समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे.

त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. माहूरमधील बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय भूमिका घेते आणि पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

✍️ संपादक : किशोर आबिटकर
**सिंहवाणी लाईव्ह न्यूज**
निर्भीड • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button