तेरवाडमध्ये भरधाव १६ चाकी कंटेनरचा तीन दुचाकींना भीषण धडक पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू अन्य तीन जण गंभीर जखमी; तेरवाड स्टँडजवळील अपघाताने परिसर हादरला

तेरवाडमध्ये भरधाव १६ चाकी कंटेनरचा तीन दुचाकींना भीषण धडक
पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
अन्य तीन जण गंभीर जखमी; तेरवाड स्टँडजवळील अपघाताने परिसर हादरला
धडक इतकी भीषण की लोखंडी बॅरिकेड तोडून कंटेनर शेतात घुसला
संदीप अडसूळ / कुरुंदवाड :
हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या १६ चाकी कंटेनरने तेरवाड येथील स्टँडजवळ रसवंती गृह परिसरात पुढे जाणाऱ्या तीन मोटारसायकलींना मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. धडक एवढी जबरदस्त होती की, मोटारसायकलीवरील काही जण रस्त्यावर फेकले गेले, तर कंटेनरने रस्त्याकडील लोखंडी बॅरिकेड तोडून थेट शेतात प्रवेश केला. या भीषण अपघातात अब्दुललाट येथील पती-पत्नी भाऊसाहेब जयपाल गिरमल आणि अश्विनी भाऊसो गिरमल यांच्यासह अर्जुनवाड येथील शकील मुल्ला या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर तेरवाड येथील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हेरवाड येथून कंटेनर भरधाव वेगाने कुरुंदवाडच्या दिशेने जात होता. तेरवाड येथील स्टँडजवळील रसवंती गृह परिसरात कंटेनरने पुढे जाणाऱ्या तीन मोटारसायकलींना मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकींवरील प्रवासी अक्षरशः रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर अनियंत्रित झालेला कंटेनर रस्त्याकडील लोखंडी बॅरिकेड तोडून शेतात घुसला.
पती-पत्नीचा जागीच मृत्यू
या भीषण अपघातात अब्दुललाट येथील भाऊसाहेब जयपाल गिरमल आणि त्यांच्या पत्नी अश्विनी भाऊसो गिरमल यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अर्जुनवाड येथील एका तरुणाचाही घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातातील गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी तेरवाड येथील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे. अन्य तीन जखमींवर उपचार सुरू आहेत.
कंटेनर शेतात घुसला
कंटेनरने दुचाकींना धडक दिल्यानंतर त्याचा वेग आणि धडकेची तीव्रता एवढी होती की, रस्त्याच्या कडेला लावलेले लोखंडी बॅरिकेड अक्षरशः तोडून कंटेनर शेतात जाऊन थांबला. त्यामुळे अपघाताचे गांभीर्य अधिक स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. रस्त्यावर दुचाकींचे अवशेष, जखमी आणि मृतदेहांचे दृश्य पाहून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांचा पंचनामा सुरू
अपघाताची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, कंटेनरचा वेग किती होता आणि चालकाचा वाहनावरील ताबा कसा सुटला, याबाबत तपास सुरू केला आहे.
अपघातामुळे काही काळ या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.
तेरवाडमध्ये अपघाताने हळहळ
भरधाव कंटेनरने तीन दुचाकींना दिलेल्या या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने अब्दुललाटमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तसेच अर्जुनवाड आणि तेरवाड परिसरातही शोककळा पसरली आहे. एकाच अपघातात चार जणांचा मृत्यू आणि तीन जण गंभीर जखमी झाल्याने या दुर्घटनेने परिसर हादरला आहे.