जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भूमकर चौकात वाहतुकीचा ‘जाम’! मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; वाकडमध्ये रोजच कोंडी

भूमकर चौकात वाहतुकीचा ‘जाम’!

मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; वाकडमध्ये रोजच कोंडी

वाहनचालक त्रस्त; वाकड पुलावरून हिंजवडीकडे जाण्यासाठी केवळ दोन मार्गिका — वाहतूक विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच सकाळ-सायंकाळ वाहतुकीचा जीवघेणा खेळ

सिंहवाणी ब्युरो / पिंपरी :
पिंपळे सौदागर, पिंपळे निलख आणि काळेवाडी फाट्याकडून वाकडच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, वाकड पुलावरून हिंजवडीकडे जाण्यासाठी केवळ दोन मार्गिका उपलब्ध असल्याने भूमकर चौक परिसरात दररोज वाहतूक कोंडीचा फास अधिकच घट्ट होत आहे. मंगळवारी (दि. ६) सायंकाळी सहा ते रात्री नऊ या गर्दीच्या वेळेत मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

विशेष म्हणजे, वाकड व हिंजवडी वाहतूक विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच सकाळी आणि सायंकाळी अशी वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक नियोजनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आयटी कर्मचाऱ्यांची गर्दी अन् वाहतुकीवर ताण

हिंजवडीतील आयटी कंपन्यांमधून काम संपल्यानंतर हजारो कर्मचारी वाकडमार्गे पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, चिंचवड तसेच मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ होतात. त्याचवेळी काळेवाडी फाटा, पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलखकडून वाकडकडे येणाऱ्या वाहनांचीही मोठी संख्या असते.

चार-पाच मार्गिकांमधून येणारा वाहतूक प्रवाह वाकड पुलावर येऊन केवळ दोन मार्गिकांमध्ये अडकतो. परिणामी पुलावर, सेवा रस्त्यावर तसेच भूमकर चौक परिसरात वाहनांच्या रांगा लागतात.

महामार्गावरच बसेस; प्रवाशांचा जीव टांगणीला

मुंबई तसेच सातारा-कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी आणि खासगी ट्रॅव्हल्स महामार्गावरच थांबवून प्रवाशांची चढ-उतार केली जात आहे. त्यामुळे आधीच कोंडीत सापडलेल्या वाहतुकीला आणखी अडथळा निर्माण होत आहे.

प्रवाशांनाही गर्दीच्या महामार्गावर वाहनांच्या मधोमध उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

सेवा रस्त्याचे कामही ठरतेय कोंडीचे कारण

भूमकर चौकाकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याची दुरवस्था आणि अपूर्ण कामाचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. वाहनांचा वेग मंदावल्याने गर्दीच्या वेळेत कोंडी आणखी तीव्र होते.

केवळ पोलिसांच्या नियोजनाने प्रश्न सुटणार?

वाढती वाहनसंख्या, विविध दिशांनी येणारा प्रचंड वाहतूक प्रवाह, वाकड पुलावरील अपुऱ्या मार्गिका, महामार्गावर थांबणारी प्रवासी वाहने आणि सेवा रस्त्याचे रखडलेले काम—या सर्व समस्यांचा एकत्रित परिणाम भूमकर चौक आणि वाकड फाट्याच्या वाहतुकीवर होत आहे.

गर्दीच्या वेळी वाहतूक कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न होत असला तरी तात्पुरत्या उपायांऐवजी या मार्गासाठी कायमस्वरूपी वाहतूक आराखड्याची गरज आहे.

> “पिंपळे सौदागर, पिंपळे निलख तसेच काळेवाडी फाट्यावरून वाकडच्या दिशेने येणारी वाहने चार ते पाच मार्गिकांमधून येतात. मात्र वाकड पुलावरून हिंजवडीच्या दिशेने जाताना केवळ दोन मार्गिका उपलब्ध असल्याने वाहतूक कोंडी होते. गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त वाहतूक कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत केली जात आहे.”
— बापू ढेरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, वाकड

तिसरी मार्गिका लवकरच; बसथांबे हटविण्याच्या सूचना

“महामार्गावर सध्या दोन मार्गिका असून तिसरी मार्गिका लवकरच पूर्ण होणार आहे. ‘पीक अवर’मधील कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला सांगण्यात आले आहे. महामार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणारे बसथांबे हटविण्याबाबत पीएमपीएमएल आणि एसटी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.”
— विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

सिंहवाणीचा सवाल 
दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या भूमकर चौक-वाकड मार्गासाठी कायमस्वरूपी वाहतूक आराखडा कधी?
केवळ गर्दीच्या वेळी पोलिसांची कुमक वाढविण्यापेक्षा मार्गिका वाढविणे, सेवा रस्त्याचे काम पूर्ण करणे आणि महामार्गावरील अनधिकृत/अडथळा ठरणारे थांबे हटविणे यावर तातडीने ठोस निर्णय होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button