महात्मा गांधी : ‘माझी जीवनकथा’तून विद्यार्थिनींना गांधी विचारांची ओळख

महात्मा गांधी : ‘माझी जीवनकथा’तून विद्यार्थिनींना गांधी विचारांची ओळख
स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल ग्रंथ वाचन प्रकल्पांतर्गत ‘महात्मा गांधी सप्ताहा’चे आयोजन
हिंगोली | सिंहवाणी ब्युरो :
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७व्या जयंतीनिमित्त हिंगोली शहरात स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल ग्रंथ वाचन प्रकल्पांतर्गत ‘महात्मा गांधी सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गांधीजींच्या विचारांचा आणि नैतिक मूल्यांचा जागर करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत सरजुदेवी भीकुलाल भारुका कन्या विद्यालयातील निवडक विद्यार्थिनींना ‘महात्मा गांधी : माझी जीवनकथा’ या ग्रंथाचे वितरण समर्पित सर्वोदय कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी १९४२च्या ‘चले जावो’ आंदोलनातील स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या कार्याचेही स्मरण करण्यात आले. त्यांनी आयुष्यभर गांधी तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली.
मुंबई सर्वोदय मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. या ग्रंथ वाचन प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अहिंसा, शांतता, सत्य आणि करुणा या गांधी विचारांतील मूलभूत नैतिक मूल्यांची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे विशाल अग्रवाल यांनी सांगितले.
ग्रंथ वाचनाचा हा उपक्रम राबविल्याबद्दल ज्येष्ठ गांधी विचारवंत टी. के. सोमय्या, प्रेमाशंकर तिवारी आदींनी आयोजकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस खादीचा सूत्रहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये गांधीजींच्या जीवनचरित्राचे वाचन आणि चिंतनाची सवय निर्माण करणारा हा उपक्रम गांधी विचारांच्या प्रसाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे
सिंहवाणी परिवाराशी स्नेहसंबंध
‘मराठवाड्याचे गांधी’ म्हणून संपूर्ण देशभर परिचित असलेले स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल (बाबूजी) यांचा सिंहवाणी परिवाराशी जिव्हाळ्याचा आणि दीर्घकाळचा स्नेहसंबंध होता. गांधीवादी विचार, सर्वोदय चळवळ आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या बाबूजींच्या कार्याशी सिंहवाणी परिवाराचा सातत्याने संपर्क राहिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार व्हावा, ही सिंहवाणी परिवाराचीही नेहमीच भूमिका राहिली आहे.