जिल्हाताज्या घडामोडी

शासकीय मानधनासाठी कलाकारांची निवड चाचणी घ्या! भुदरगड तालुक्यातील लोककलावंतांची मागणी; लोककलावंत संघाकडे निवेदन सादर

शासकीय मानधनासाठी कलाकारांची निवड चाचणी घ्या!:

भुदरगड तालुक्यातील लोककलावंतांची मागणी; लोककलावंत संघाकडे निवेदन सादर

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
विविध लोककलांच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या पात्र व गरजू कलावंतांना शासनाच्या कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी कलाकारांची निवड केवळ कागदपत्रांच्या आधारे न करता प्रत्यक्ष कलागुणांची चाचणी घेऊनच पात्रता निश्चित करावी, अशी मागणी भुदरगड तालुक्यातील लोककलावंतांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन भुदरगड तालुक्यातील लोककलावंतांच्या वतीने लोककलावंत संघाचे अध्यक्ष विलास पाटील (बेलवळेकर) यांच्याकडे सादर करण्यात आले.

कलाकारांना आर्थिक आधार मिळावा, त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उपजीविकेला हातभार लागावा, या उद्देशाने शासनामार्फत कलाकार मानधन योजना राबविण्यात येते. मात्र, खऱ्या अर्थाने कला सादर करणारे अनेक कलावंत या योजनेपासून वंचित राहत असल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या शासन दरबारी सादर झालेल्या प्रस्तावांच्या आधारे कागदपत्रांची छाननी करून पात्रता निश्चित केली जाते. मात्र, अर्जदाराची प्रत्यक्ष कलाकार चाचणी अथवा कलागुणांची पडताळणी होत नसल्याने योजनेच्या मूळ उद्देशालाच बाधा येण्याची शक्यता आहे, असे कलाकारांचे म्हणणे आहे.

प्रत्यक्ष कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांची निवड करण्यासाठी निवड चाचणी, प्रत्यक्ष सादरीकरण आणि संबंधित कलेतील कौशल्याची पडताळणी करण्यात यावी. यामुळे खऱ्या व गरजू कलाकारांना न्याय मिळेल आणि कलाकार नसलेल्या व्यक्तींना केवळ कागदपत्रांच्या आधारे मानधनाचा लाभ मिळण्याची शक्यता कमी होईल, अशी भूमिका भुदरगड तालुक्यातील कलाकारांनी मांडली आहे.

पात्र कलाकारांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, तसेच शासनाच्या कलाकार मानधन योजनेचा उद्देश प्रभावीपणे साध्य व्हावा, यासाठी निवड प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर जयसिंग पाटील, धोंडीराम पाटील, बापू पाटील, ज्ञानदेव देसाई, बळवंत वैराट, उत्तम सुतार, शहाजी देसाई, रमेश देसाई, दिनकर साठे, शिवाजी झोरे, सदाशिव रेडेकर, आनंद सोहनी, सुजल निंबाळकर, सुनील लोहार, सुभाष सुतार, सखाराम पाटील, प्रकाश गुरव, शिवाजी दळवी, बाजीराव मेंगाणे, शिवाजी बाऊसकर, बळवंत मोरे, शंकर पाटील, खंडेराव दबडे, धनाजी पोवार, शिवाजी पोवार, बाळासाहेब पोवार, बबन बेलेकर, एस. के. पाटील, विलास पोवार, तानाजी पाटील, लक्ष्मण मुरकर, संभाजी गुरव, दशरथ कुंभार, पांडुरंग कांबळे आदी कलाकारांच्या सह्या आहेत.

— सिंहवाणी लाईव्ह न्यूज
संपादक : किशोर आबिटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button