जिल्हाताज्या घडामोडी

मौनी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रयोगांना शिवाजी विद्यापीठाचे सर्वोतोपरी सहकार्य : कुलगुरू डॉ. राजनीश कामत: ग्रामीण-शहरी शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा

मौनी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रयोगांना शिवाजी विद्यापीठाचे सर्वोतोपरी सहकार्य : कुलगुरू डॉ. राजनीश कामत

ग्रामीण-शहरी शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक दरी मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या प्रशिक्षणाच्या संधीही वाढविता येतील. मौनी विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध शैक्षणिक प्रयोगांना शिवाजी विद्यापीठाचे सर्वोतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.

गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठातर्फे ‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण-शहरी शैक्षणिक दरी कमी करणे’ या विषयावर आयोजित मुक्त संवाद कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकरअप्पा देसाई होते.

यावेळी नाबार्डचे माजी अध्यक्ष व महासंचालक तथा मौनी विद्यापीठाचे डॉ. यशवंतराव थोरात, गरवारे टेक्निकल फायबर्सचे अध्यक्ष डॉ. संजय चराटी, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाच्या सी.ओ.ई. देवश्री पाटील, माजी प्राचार्या डॉ. अनिता बोडके, मौनी विद्यापीठाच्या विश्वस्त सौ. पल्लवी कोरगावकर, सदस्य बाजीराव चव्हाण, कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगले, जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर आदी उपस्थित होते.

कौशल्याधारित लघु अभ्यासक्रमांवर भर

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, मौनी विद्यापीठात विविध कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे केंद्र सुरू करण्यात येईल. कमी कालावधीचे अनेक अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासोबत प्रत्यक्ष कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाईल. शिवाजी विद्यापीठाने हाती घेतलेल्या ‘एक विद्यापीठ, दहा महाविद्यालये, शंभर शाळा’ या उपक्रमात मौनी विद्यापीठाचा पहिला समावेश असेल.

आजच्या काळात स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणारे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान रोजगार हिरावत नाही, तर रोजगाराचे स्वरूप बदलते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या संपणार नसून त्यांचे स्वरूप बदलणार आहे. येत्या काळात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण विद्यार्थ्यांना समान संधी मिळणे आवश्यक

डॉ. यशवंतराव थोरात यांनी विषयाची मांडणी करताना ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक दरी कमी करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीही शिक्षणाच्या विविध संधी खुल्या झाल्या आहेत. मात्र गुणवत्ता, कौशल्य आणि रोजगाराच्या संधींच्या बाबतीत ग्रामीण विद्यार्थी अजूनही मागे आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता वाढविणे, त्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षित करणे आणि शिक्षणातून रोजगाराशी थेट जोड निर्माण करणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठाने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्षमता निर्मितीचा आणि प्रत्यक्ष रोजगाराचा दुवा बनावे, अशी अपेक्षाही डॉ. थोरात यांनी व्यक्त केली.

मौनी विद्यापीठाला ग्रामीण शिक्षणाचा प्रयोगाचे केंद्र बनविणार

चेअरमन मधुकर देसाई म्हणाले, मौनी विद्यापीठाची ग्रामीण विद्यापीठ म्हणूनची ओळख आणि शैक्षणिक परंपरा मोठी आहे. हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना अद्ययावत तंत्रज्ञान, व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षणावर संस्थेचा भर राहणार आहे. रोजगाराभिमुख शिक्षण, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रभावी केंद्र म्हणून मौनी विद्यापीठ विकसित करण्याचा प्रयत्न राहील.

‘चाकोरीबाहेरच्या शिक्षणा’चा देशातील पहिला प्रयोग

ग्रामीण भागातील शिक्षण सक्षमीकरणासाठी शिवाजी विद्यापीठ पुढाकार घेणार असल्याचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी स्पष्ट केले. मौनी विद्यापीठासारख्या संस्थांच्या सहकार्याने ग्रामीण शिक्षण सक्षमीकरणाचा नवा प्रयोग राबविला जाणार असून, चाकोरीबाहेरच्या शिक्षणाचा हा देशातील पहिला प्रयोग ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, नियम आणि कायदे शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना विचार करायला शिकविणारे कुलगुरू डॉ. कामत असल्याचे गौरवोद्गार डॉ. यशवंतराव थोरात यांनी काढले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे यांनी केले. डॉ. संजय चराटी यांनी मनोगत व्यक्त केले. मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. पी. बी. पाटील यांनी आभार मानले. डॉ. ऋतुजा लाड यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. संजय देसाई, सुप्निल तांबेकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कर्मवीर हिरे महाविद्यालयाने कार्यक्रमाचे संयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button