जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शारदीय नवरात्रात कर्तव्यात कसूर केली तर गय केली जाणार नाही! जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

 माहूर : शारदीय नवरात्रात कर्तव्यात कसूर केली तर गय केली जाणार नाही!

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

माहूर गडावरील नवरात्रोत्सव नियोजनाचा आढावा; १२० एसटी बसेस, आरोग्य पथके, सुरक्षा व्यवस्था सज्ज

सिंहवाणी ब्युरो / संजय घोगरे, माहूर 
साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या श्री रेणुका मातेच्या माहूर गडावर ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाविकांना सुलभ दर्शन, सुरक्षित वाहतूक, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छता, वीज आणि सुरक्षा याबाबत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे. यात्राकाळात कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला.

माहूर गडावरील परशुराम मंदिर परिसरात मंगळवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सव नियोजनाची आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी विविध विभागांकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला.

बैठकीस सहधर्मादाय आयुक्त तथा संस्थानच्या पदसिद्ध अध्यक्षा हिराबाई शेळके, पोलीस अधीक्षक नीलभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, सहायक जिल्हाधिकारी बी. सरवणन, तहसीलदार अभिजीत जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दर्शन व्यवस्था, पाणी आणि स्वच्छतेवर भर

नवरात्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक माहूर गडावर दाखल होणार असल्याने सुलभ दर्शनासाठी रांगा, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, शौचालये आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांसाठी साबुदाणा खिचडी व फळांचीही व्यवस्था केली जाणार आहे.

नगरपंचायतीकडून दत्त चौक टी-पॉईंट येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून, पथदिवे, शौचालये आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था केली जाणार आहे.

वन्यप्राण्यांपासून सुरक्षेसाठी विशेष पथके

माहूर गड परिसर जंगलाने वेढलेला असल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. वन्यप्राण्यांपासून भाविकांचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षा पथके तैनात करून जंगल परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यात्रेपूर्वी आवश्यक रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

४० पैकी २० बेड यात्रेसाठी राखीव

यात्राकाळात आरोग्य व्यवस्थेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. माहूर ग्रामीण रुग्णालयातील ४० पैकी २० बेड नवरात्रोत्सवासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.

दत्तशिखर, अनुसया माता मंदिर तसेच रेणुका मंदिराच्या पायथ्याशी स्वतंत्र आरोग्य पथके आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.

भाविकांसाठी १२० एसटी बसेस

नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या १२० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे माहूरकडे ये-जा करणाऱ्या भाविकांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

महावितरणकडून यात्राकाळात अखंडित वीजपुरवठ्याची ग्वाही देण्यात आली. तसेच नवरात्रोत्सवापूर्वी महामार्गावरील बंद असलेले पथदिवे सुरू करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आले.

गडावर खासगी वाहनांना बंदी; माहूर शहरात पार्किंग

नवरात्रोत्सवाच्या काळात गडावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. भाविकांच्या वाहनांसाठी माहूर शहरातील दत्तशिखर संस्थानच्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पुरातत्व, अन्न व औषध प्रशासनाच्या गैरहजेरीवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, बैठकीस पुरातत्व विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित असल्याचा मुद्दा ज्येष्ठ पत्रकार विजय आमले यांनी उपस्थित केला. एवढ्या मोठ्या धार्मिक यात्रेच्या नियोजन बैठकीला संबंधित विभागांचे प्रमुख गैरहजर राहणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी गंभीर दखल घेत “या बाबीकडे लक्ष दिले जाईल,” असे स्पष्ट केले.

कागदावरील नियोजन प्रत्यक्षात उतरविण्याचे आव्हान

माहूरचा नवरात्रोत्सव हा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. लाखो भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासमोर भाविकांची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि आवश्यक सुविधांचा अखंड पुरवठा हे मोठे आव्हान आहे.

त्यामुळे बैठकीत मांडलेले नियोजन केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरविणे आवश्यक आहे. भाविकांचा प्रवास सुखकर, दर्शन सुलभ आणि संपूर्ण यात्रा सुरक्षित करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे.

बैठकीचे सूत्रसंचालन तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले, तर विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी आभार मानले. यावेळी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीस वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, नगरपंचायत मुख्याधिकारी विवेक कांदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी. के. भिसे, तालुका आरोग्य अधिकारी राजेश माचेवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ओंकार साबळे, महावितरणचे उपअभियंता वसमतकर, महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता एस. एस. देशपांडे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड, संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button