क्राईमजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाईकवाडी कड्यावरील 24 तासात खुनाचा उलगडा; लग्न ठरल्याच्या रागातून प्रेयसीला २५० फूट खोल दरीत ढकलले! पोलिसांच्या चौकशीत संशयिताची कबुली, आंबोली रेस्क्यू टीमच्या चार-पाच तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर

नाईकवाडी कड्यावरील 24 तासात खुनाचा उलगडा;

लग्न ठरल्याच्या रागातून प्रेयसीला २५० फूट खोल दरीत ढकलले!
पोलिसांच्या चौकशीत संशयिताची कबुली,

आंबोली रेस्क्यू टीमच्या चार-पाच तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर

सिंहवाणी ब्युरो | गारगोटी | पाटगाव
दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरल्याने भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रेयसीला दुर्गम ठिकाणी बोलावून कड्यावरून खोल दरीत ढकलून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार भुदरगड तालुक्यातील शिवडावजवळील नाईकवाडी कड्यावर उघडकीस आला आहे. तरन्नूम बशीर नाईक (वय २२, मूळ रा. पाटगाव, सध्या रा. गारगोटी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी भुदरगड पोलिसांनी श्रीपाद दिनकर वडर (वय २५, रा. अवधूत कॉलनी, गारगोटी) याला अटक केली आहे. सुमारे २५० फूट खोल दरीत पडलेला तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी आंबोली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करावे लागले. चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

या घटनेमुळे गारगोटी आणि भुदरगड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रेमसंबंधातून वाद; लग्न ठरल्याने भेटण्यास नकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरन्नूम नाईक आणि श्रीपाद वडर हे एकमेकांच्या घरासमोर राहत असल्याने त्यांची ओळख होती. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. तरन्नूम अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. दरम्यान, सुमारे चार महिन्यांपूर्वी तिचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरले. त्यानंतर तिने श्रीपादला भेटण्यास टाळाटाळ सुरू केली होती.

याच कारणावरून श्रीपादच्या मनात राग होता. तरन्नूमने यापुढे भेटणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दोघांमधील वाद विकोपाला गेल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

शुक्रवारी सकाळी कड्यावर बोलावले

शुक्रवारी (ता. ९) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास श्रीपादने तरन्नूमला शिवडावपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील नाईकवाडी येथील दुर्गम कड्यावर भेटण्यासाठी बोलावले. तेथे दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून वादावादी झाली. तरन्नूमने लग्न ठरल्यामुळे यापुढे भेटणार नसल्याचे सांगितल्याने संतापलेल्या श्रीपादने तिला कड्यावरून खोल दरीत ढकलल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुर्गम आणि खोल दरीचा परिसर असल्याने घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

तरुणी बेपत्ता; आईची अपहरणाची तक्रार

शुक्रवारी सायंकाळपर्यंत तरन्नूम घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईने भुदरगड पोलिस ठाण्यात धाव घेऊन अपहरणाची तक्रार दिली. यावेळी त्यांनी श्रीपादवर संशय व्यक्त केला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच श्रीपादला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

चौकशीदरम्यान श्रीपादने आपण दोघे नाईकवाडी कड्यावर फिरायला गेलो होतो, असे सांगितले. तरन्नूम पाणी आणण्यासाठी गेली आणि त्यानंतर ती कुठे गायब झाली, हे समजले नसल्याचा बनाव त्याने केल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी नेले अन् बनाव उघड

श्रीपादच्या जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याला रात्रीच नाईकवाडी कड्यावर नेऊन घटनास्थळी चौकशी केली. त्याच्या बोलण्यात संशयास्पद बाबी आढळल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

यानंतर पोलिसांनी रात्रीच शोधमोहीम राबवली. मात्र, कड्याखालील खोल दरी आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे मृतदेह शोधण्याचे काम अत्यंत कठीण बनले.

आंबोलीच्या रेस्क्यू टीमचे थरारक बचावकार्य

शनिवारी तरुणीचा शोध घेण्यासाठी आंबोली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. पथकाने रोपच्या साहाय्याने सुमारे २५० फूट खोल दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दरीत तरन्नूमचा मृतदेह आढळला.

रेस्क्यू टीमने अत्यंत काळजीपूर्वक मृतदेह दरीतून बाहेर काढला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. दुर्गम कड्यावरून खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याच्या या मोहिमेत रेस्क्यू टीमला मोठे परिश्रम घ्यावे लागले.

पोलिस पथकाकडून गुन्ह्याचा उलगडा

भुदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अली मुल्ला, आमीर नदाफ, स्वप्नील मोरे, तानाजी डवरी, विकास कांबळे आणि शीतल पाडेकर यांच्या पथकाने तपास करून या प्रकरणाचा उलगडा केला.

लग्न ठरल्याच्या कारणावरून प्रेमसंबंधात निर्माण झालेला वाद एका तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून, पुढील तपास भुदरगड पोलिस करीत आहेत.

सिंहवाणी लाईव्ह न्यूज
संपादक : किशोर आबिटकर
निर्भीड • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button