ऐन नवरात्रोत्सवात इंजूबाई मंदिरात चोरी! देवीची तांब्याची घागर पळविणाऱ्या तरुणाला भक्तांनी पकडले; संतप्त ग्रामस्थांकडून धुलाई, पोलिसांच्या हवाली मंदिरात मुक्काम, भक्तांनी दिला फराळ; पहाटे चोरी करून पळ काढला!

ऐन नवरात्रोत्सवात इंजूबाई मंदिरात चोरी!
देवीची तांब्याची घागर पळविणाऱ्या तरुणाला भक्तांनी पकडले; संतप्त ग्रामस्थांकडून धुलाई, पोलिसांच्या हवाली
मंदिरात मुक्काम, भक्तांनी दिला फराळ; पहाटे चोरी करून पळ काढला!
सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
गारगोटी-सोनाळी येथील ग्रामदैवत श्री इंजूबाई मंदिरात ऐन नवरात्रोत्सवाच्या काळातच चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवीच्या दर्शनासाठी आणि नवरात्र उपवासासाठी मंदिरात मुक्कामाला असलेल्या भाविकांमध्ये मिसळून रात्री मंदिरात झोपलेल्या एका तरुणाने पहाटे देवीची तांब्याची मोठी घागर चोरून पळ काढला. मात्र, भाविकांच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव उधळला. घागर घेऊन पळणाऱ्या तरुणाचा पाठलाग करून त्याला गारगोटी शहरातील आजरा अर्बन बँकेच्या चौकात पकडण्यात आले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्याला मंदिरात आणून चोप दिला आणि भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकारामुळे सोनाळी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भक्तांनी दिला फराळ; त्याच मंदिरातील वस्तूवर डल्ला!
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाळी येथील श्री इंजूबाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस उपवास करणाऱ्या महिला आणि पुरुष भाविकांचे वास्तव्य मंदिरातच आहे. भक्तिभावाने देवीची सेवा, पूजा-अर्चा आणि आरती सुरू असताना काल रात्री एक तरुण मंदिरात आला. मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांनी त्याला फराळ खाण्यास दिला. त्यानंतर तो तरुण मंदिरातच झोपला. या तरुणाने आपले नाव माने असून आपण कुंभारवडा बोरवडे ता कागल असे सांगितले होते.
रात्री मंदिरात मुक्काम करणारा हा तरुण पहाटेपर्यंत भाविकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेईल, अशी कोणालाही कल्पना नव्हती. पहाटे भाविक उठले. आंघोळ करून देवीच्या आरतीची तयारी सुरू झाली. त्याचवेळी नळाजवळ ठेवलेली देवीची तांब्याची मोठी घागर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मंदिरात शोधाशोध केली असता, रात्री मुक्कामाला असलेला तरुणही दिसेनासा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाविकांचा संशय बळावला.
भाविकांचा पाठलाग; आजरा अर्बन बँकेच्या चौकात पकडले!
घागर चोरीला गेल्याचे लक्षात येताच राजाराम तोंदले, आनंदा गुरव, उत्तम देसाई, पुजारी अशोक गुरव आणि कांबळे यांच्यासह भाविकांनी वेळ न दवडता तरुणाचा शोध सुरू केला. तो ज्या दिशेने गेला होता, त्या दिशेने काही तरुण मोटारसायकलवरून त्याच्या मागावर निघाले. शोध घेत असताना तो गारगोटी शहरातील आजरा अर्बन बँकेच्या चौकात आढळून आला.
त्याच्या खांद्यावर असलेल्या पोत्यात मंदिरातील चोरीची तांब्याची घागर असल्याचे दिसून आले. तरुणांना घागरीसह त्याला मंदिरात आणायचे होते; मात्र तो त्यांना दाद देत नव्हता . दरम्यान, आणखी काही जण त्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्या मदतीने त्याला पकडून मंदिरात आणण्यात आले.
मंदिरात आणताच संतप्त ग्रामस्थांचा रोष
देवीच्या मंदिरातच चोरी झाल्याचे समजल्यानंतर उपस्थित भाविक आणि ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. मंदिरात आणलेल्या तरुणाला संतप्त लोकांनी चोप दिला. त्यानंतर त्याला जवळच असलेल्या भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, हा तरुण रात्री मंदिरात मुक्काम करून काही मौल्यवान वस्तू मिळतात का, याच्या शोधात असावा, असा संशय मंदिरातील उपस्थितांनी व्यक्त केला. मोठी चोरी करण्याची संधी न मिळाल्याने त्याने अखेर काही हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या घागरीवर डल्ला मारला असावा, अशीही चर्चा भाविकांमध्ये होती.
पवित्र नवरात्रोत्सवात चोरी; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस भक्तांसाठी श्रद्धा, उपासना आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जातात. अशा काळात ग्रामदैवताच्या मंदिरात मुक्काम करून भाविकांचा विश्वास संपादन केल्यानंतर मंदिरातील वस्तू चोरण्याचा प्रकार घडल्याने सोनाळी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा आणि मंदिरातील वातावरणाचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्याची गरज ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी अधिक सतर्कता ठेवणे, मौल्यवान वस्तूंची सुरक्षित व्यवस्था करणे आणि संशयास्पद हालचालींकडे लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना या घटनेनंतर पुढे आली आहे.
दरम्यान, संबंधित तरुणाविरुद्ध पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई काय केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.