जिल्हाताज्या घडामोडी

अवैध धंद्यांवर वचक ठेवा; नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा! पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची गारगोटी पोलीस ठाण्याला भेट; पोलीस पाटलांना दिले स्पष्ट निर्देश

अवैध धंद्यांवर वचक ठेवा; नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा!

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची गारगोटी पोलीस ठाण्याला भेट; पोलीस पाटलांना दिले स्पष्ट निर्देश

सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल (भा.पो.से.) यांनी भुदरगड तालुक्यातील गारगोटी पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट देऊन कायदा-सुव्यवस्था आणि पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास गतिमान करणे आणि नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

गारगोटी पोलीस ठाण्यात आगमन झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी प्रसन्न ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

पोलीस पाटलांशी थेट संवाद

भुदरगड तालुक्यातील सर्व गावांच्या पोलीस पाटलांची आढावा बैठक घेऊन त्यांनी गावपातळीवरील परिस्थिती जाणून घेतली. गावातील तंटे सामोपचाराने मिटवणे, सामाजिक शांतता व सलोखा टिकवणे तसेच अवैध धंदे आणि संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना देणे, अशा सूचना त्यांनी दिल्या. गावपातळीवरील शांतता राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

जुगार, अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाईचे आदेश

पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांशी संवाद साधताना प्रलंबित गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषारोपपत्रे वेळेत न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. जुगार, अवैध दारू विक्री यांसारख्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून त्यांना आळा घालण्यावर भर देण्यात आला.

पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि महिलांशी सौजन्याने वागावे. त्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही पोलीस अधीक्षकांनी दिल्या. यावेळी त्यांनी गुन्हे नोंदवही, विविध अभिलेख, लॉकअप आणि शस्त्रागाराची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.

या भेटीप्रसंगी गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, गारगोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमीन मुल्ला, पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच भुदरगड तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.

सिंहवाणी लाईव्ह न्यूज
*सत्याच्या बाजूने उभी राहणारी पत्रकारिता!*
संपादक – किशोर आबिटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button