जिल्हा पोलीस प्रमुखांच्या गारगोटी भेटीनंतर चोरट्यांची चोरीची सलामी! गारगोटीत दोन घरांमध्ये चोरी; तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न, सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

जिल्हा पोलीस प्रमुखांच्या गारगोटी भेटीनंतर चोरट्यांची चोरीची सलामी!
गारगोटीत दोन घरांमध्ये चोरी; तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न, सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास
पोलिस अधीक्षक नीलोत्पल बसू यांच्या भुदरगड पोलीस ठाण्याच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत चोरट्यांचा धुमाकूळ; शहरात खळबळ, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांनी शनिवारी भुदरगड पोलीस ठाण्याला प्रथमच भेट देऊन गुन्हेगारीला आळा घालणे, तपासाची कार्यपद्धती आणि पोलिसांच्या कामकाजाबाबत सूचना केल्या. मात्र, त्यांच्या भेटीनंतर अवघ्या बारा तासांच्या आतच गारगोटी शहरातील अवधूत कॉलनीत चोरट्यांनी दोन घरांना लक्ष्य करत सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली, तर तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न केला. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या भेटीनंतर घडलेल्या या घटनांनी शहरात खळबळ उडाली असून, चोरट्यांनी पोलिसांसमोरच आव्हान उभे केल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
अवधूत कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ
गारगोटी शहरातील अवधूत कॉलनीमध्ये शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडीच्या घटना घडवून आणल्या. यामध्ये पूनम दिनकर वडर यांच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि चांदीची सहा जोडवी असा सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती आहे.
याच कॉलनीत समोरच राहणाऱ्या रत्नाबाई विठोबा देसाई यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचा कुलूप-कोयंडा तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी तीन हजार रुपये रोख रक्कम, चांदीची मासोळी आणि इतर दागिने लंपास केले. एकाच परिसरातील दोन घरांमध्ये चोरी झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न
चोरट्यांनी याच कॉलनीतील ओमकार राजाराम वारके यांच्या घरातही चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. एकाच रात्री एकाच परिसरात दोन घरफोड्या आणि तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याने चोरट्यांनी परिसराची रेकी केली होती का, तसेच या घटनांमागे एकाच टोळीचा हात आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या बाबींचा तपासातून उलगडा होणे अपेक्षित आहे.
पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतरही घरफोड्या; नागरिकांमध्ये चिंता
शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांनी भुदरगड पोलीस ठाण्याला भेट देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या होत्या. गुन्ह्यांचा तपास आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात असतानाच, त्यानंतर काही तासांत गारगोटीत घरफोड्यांच्या घटना घडल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीसह शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील निवासी भागांत रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि घरफोड्यांमधील आरोपींचा तातडीने शोध घेणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. विशेषतः घर बंद ठेवून बाहेर जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
भुदरगड पोलिसांकडून तपास सुरू
या चोरीच्या घटनांची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल पाटील पुढील तपास करत आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोणती पावले उचलतात आणि या घटनांचा छडा किती लवकर लागतो, याकडे गारगोटीकरांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुखांच्या भेटीनंतर लगेचच घडलेल्या या घरफोड्यांमुळे गारगोटी शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत. चोरट्यांना पकडून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे आव्हान आता भुदरगड पोलिसांसमोर आहे.