जिल्हाताज्या घडामोडी

मोबाईल नेटवर्क म्हणजे ‘आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं’! कडगावसह भुदरगड तालुक्यात अडीच तास मोबाईल सेवा ठप्प; ग्राहकांचा संताप

मोबाईल नेटवर्क म्हणजे ‘आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं’!

कडगावसह भुदरगड तालुक्यात अडीच तास मोबाईल सेवा ठप्प; ग्राहकांचा संताप

रिचार्जचे पैसे वेळेवर घेता, मग सेवा देताना कंपन्यांना का येतो अडथळा?
प्रकाश पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

सिंहवाणी ब्युरो / प्रकाश खतकर, करडवाडी

मोबाईल आज चैनीची वस्तू राहिलेली नसून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाची अत्यावश्यक गरज बनली आहे. रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा कामगार असो, शेतकरी असो, विद्यार्थी असो अथवा छोटा व्यावसायिक—प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार मोबाईल रिचार्जसाठी पैसे खर्च करतो. मात्र, रिचार्जचे पैसे घेतल्यानंतर गरजेच्या वेळी नेटवर्कच गायब होत असेल, तर ग्राहकांनी नेमके कोणाकडे दाद मागायची? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

कडगाव परिसरासह संपूर्ण भुदरगड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सुमारे सात ते साडेनऊ वाजेपर्यंत तब्बल अडीच तास मोबाईल नेटवर्क सेवेत व्यत्यय आल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. जिओ, एअरटेल आणि व्हीआय या प्रमुख मोबाईल सेवांमध्ये अडथळा निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार आहे.

या काळात फोन कॉल, इंटरनेट, ऑनलाइन व्यवहार, डिजिटल पेमेंट तसेच विविध ऑनलाइन सेवांवर परिणाम झाला. आजच्या डिजिटल युगात मोबाईल नेटवर्क बंद पडणे म्हणजे केवळ फोन न लागणे एवढ्यापुरती समस्या राहिलेली नाही; तर अनेकांचे व्यवहार, कामकाज आणि संपर्कव्यवस्था ठप्प होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते.

रिचार्जचा पैसा पूर्ण, सेवा मात्र अधुरी!

मोबाईल कंपन्यांकडून रिचार्जच्या विविध प्लॅनसाठी ग्राहकांकडून नियमितपणे पैसे घेतले जातात. त्यात सातत्याने दरवाढही होत आहे. मात्र पैसे वाढवून घेतल्यानंतर सेवेत सातत्य का दिसत नाही? हा सामान्य ग्राहकांचा मूलभूत प्रश्न आहे.

दिवसभर कष्ट करून मिळालेल्या पैशातून रिचार्ज करणाऱ्या ग्राहकाला गरजेच्या वेळी फोनही करता येत नसेल, इंटरनेट वापरता येत नसेल किंवा ऑनलाइन व्यवहार करता येत नसतील, तर भरलेल्या रिचार्जचा फायदा तरी काय? त्यामुळे ‘आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं’ अशी अवस्था ग्राहकांची झाली असल्याची संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

दरवाढ मात्र झपाट्याने; नेटवर्क सुधारणा कधी?

मोबाईल रिचार्जच्या किंमती वाढत असताना त्याच तुलनेत नेटवर्कची गुणवत्ता आणि सेवा सातत्याने उपलब्ध राहणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या सातत्याने जाणवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

दिवसातून वारंवार नेटवर्क गायब होणे, कॉल ड्रॉप होणे, इंटरनेटचा वेग कमी होणे आणि अचानक सेवा बंद पडणे यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. मोबाईल कंपन्यांनी केवळ रिचार्जची रक्कम वसूल करण्याकडे लक्ष न देता प्रत्यक्ष सेवा सुधारण्याकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

अन्यथा आंदोलनाचा इशारा

मोबाईल कंपन्यांनी रिचार्जच्या किंमती वाढवल्या आहेत. त्याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. त्यातच वारंवार नेटवर्क गायब होऊन संभाषण आणि इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत होत चालला आहे.

“मोबाईल कंपन्यांनी रिचार्जच्या किंमती वाढवल्या असतील तर त्याबरोबर दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. दिवसातून अनेक वेळा नेटवर्क गायब होण्याच्या समस्येचा गांभीर्याने विचार करून तातडीने सुधारणा करावी. अन्यथा ग्राहकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी दिला.

ग्राहकांच्या खिशातून रिचार्जचे पैसे नियमितपणे घेणाऱ्या कंपन्यांनी आता ग्राहकांना ‘नेटवर्कच्या शोधात’ भटकायला लावू नये. भुदरगडसारख्या ग्रामीण भागातील नेटवर्क व्यवस्थेची तातडीने दखल घेऊन ठोस सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

सिंहवाणी लाईव्ह न्यूज
संपादक : किशोर आबिटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button