क्राईमजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आत्महत्या की घातपात? ज्योती टिपुगडे यांच्या मृत्यूभोवती संशयाचे सावट! भावाचा गंभीर आरोप; “बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केले की तिचा घातपात झाला?” — वरिष्ठ पातळीवर स्वतंत्र चौकशीची मागणी

आत्महत्या की घातपात? ज्योती टिपुगडे यांच्या मृत्यूभोवती संशयाचे सावट!

भावाचा गंभीर आरोप; “बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केले की तिचा घातपात झाला?” — वरिष्ठ पातळीवर स्वतंत्र चौकशीची मागणी

किशोर आबिटकर / गारगोटी
राधानगरी तालुक्यातील पडळी येथे विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या ज्योती नारायण टिपुगडे यांच्या मृत्यूचे प्रकरण आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हा मृत्यू आत्महत्या नसून घातपात अथवा खून झाला असण्याचा संशय व्यक्त करत ज्योती यांचे भाऊ नवनाथ अजित माने (रा. सोनाळी, ता. भुदरगड) यांनी या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल व स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नवनाथ माने यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती देताना, आपल्या बहिणीला सासरी अनेक वर्षांपासून कौटुंबिक त्रास, मानसिक छळ आणि मारहाणीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केला. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास केवळ कागदोपत्री न राहता घटनेच्या सर्व पैलूंची तपासणी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

26 ऑगस्टला बेपत्ता, दुसऱ्याच दिवशी विहिरीत मृतदेह

माने यांच्या म्हणण्यानुसार, 26 ऑगस्ट 2026 रोजी ज्योती घरातून निघून गेल्याची माहिती त्यांच्या सासरच्या मंडळींनी राधानगरी पोलिसांना दिली होती. त्याच दिवशी माहेरीही फोन करून ज्योती घरातून निघून गेल्याचे सांगण्यात आले.

ही माहिती मिळाल्यानंतर सोनाळी येथील काही युवकांसह नवनाथ माने रात्री ज्योती यांच्या घरी गेले. मात्र, त्या वेळी घरातील वातावरण पाहता परिस्थितीचे गांभीर्य जाणवत नसल्याचा दावा माने यांनी केला.

त्यानंतर ते गारगोटीला परतले. 27 ऑगस्टच्या सकाळी ज्योती यांचा मृतदेह पडळी येथील एका शेतातील विहिरीत सापडल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली.

आम्हाला संशय होता; मात्र तक्रार घेण्यात टाळाटाळ झाली”

मृतदेह सापडल्यानंतर माहेरच्या मंडळींनी पोलिसांकडे पोस्टमार्टमपूर्वीच घातपाताच्या संशयाची नोंद घ्यावी, अशी विनंती केली होती. मात्र, अशा प्रकारची तक्रार घेता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा माने यांनी केला.

यानंतर नवनाथ माने यांनी 27 ऑगस्ट रोजी राधानगरी पोलिसांकडे लेखी निवेदन दिले असून त्याची पोहोच घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरही पोलिसांशी सातत्याने संपर्क साधला असता, “रिपोर्ट येणे बाकी आहेत; रिपोर्ट आल्यानंतर पाहू,” असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

या सर्व घटनाक्रमामुळेच बहिणीच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांच्या मनातील संशय अधिक तीव्र झाल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

वर्षानुवर्षे त्रास सहन करत होती”

नवनाथ माने यांनी आरोप केला की, ज्योती यांचे पती दारू पिऊन मारहाण करणे, मानसिक त्रास देणे असे प्रकार करत होते. सासू-सासरे व नणंद यांच्याकडूनही जाच होत असल्याचे त्यांनी सांगितले.

“आम्ही अनेक वेळा चार माणसे घेऊन तिच्या सासरी जाऊन समजावून सांगितले. काही दिवस परिस्थिती सुरळीत राहायची आणि पुन्हा त्रास सुरू व्हायचा,” असा दावा माने यांनी केला.

घटनेच्या काही दिवस आधीही ज्योतीच्या सासरी दोन-तीन दिवस जोरदार भांडणे झाल्याचे ज्योतीने फोनवरून सांगितले होते, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

शेवटी हे कोणत्या परिस्थितीत घडले?”

ज्योतीने फोनवरून घरातील परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या भावकीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीलाही फोन करून ज्योतीच्या सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच ज्योतीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने कुटुंबीय हादरले आहेत.

मृत्यू आत्महत्या की घातपात? तपासाची मागणी

ज्योती यांनी आत्महत्या केली असे गृहीत न धरता त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले का, त्यांचा घातपात झाला का अथवा अन्य कोणती घटना घडली, याचा सर्वंकष तपास करावा, अशी मागणी नवनाथ माने यांनी केली आहे.

कौटुंबिक छळ, मानसिक जाच अथवा हुंडाबळीच्या अनुषंगानेही तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली असल्याचे सांगितले.

माझ्या बहिणीच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले पाहिजे. आत्महत्या असेल तर त्यामागचे कारण आणि घातपात असेल तर त्यामागील व्यक्ती समोर आली पाहिजे. आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे,” अशी मागणी नवनाथ माने यांनी केली.

या प्रकरणातील पोस्टमार्टम अहवाल, पोलिस तपास, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर उपलब्ध तथ्यांमधूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पोलिस तपास कोणत्या दिशेने जातो आणि या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होते, याकडे गारगोटी-राधानगरी परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button