जिल्हाताज्या घडामोडी

देवचंद महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृतीचा जागर: नाटक, गीत आणि कवितेतून विद्यार्थ्यांनी दिला ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश

देवचंद महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृतीचा जागर:

नाटक, गीत आणि कवितेतून विद्यार्थ्यांनी दिला ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश

अर्जुननगर / सिंहवाणी ब्युरो :
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि ऑनलाइन फसवणुकीचे नवनवे प्रकार लक्षात घेता देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथील संगणकशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला. नाटक, गीत, कविता आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.

देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर आणि क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमाची माहिती देताना प्रा. प्रशांत कुंभार यांनी सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका अधोरेखित केला. मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असताना प्रत्येकाने सायबर सुरक्षेबाबत सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नाटकातून ऑनलाइन फसवणुकीचे वास्तव

कु. प्रणोती सुतार, कु. अश्विनी मुळीक, कु. मधुरा पुंडे, कु. चंदना मोरे आणि कु. श्रावणी पाटील यांनी मुलींची ऑनलाइन फसवणूक तसेच संशयास्पद लिंकच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीवर आधारित नाटक सादर केले. या नाटकातून कोणतीही लिंक क्लिक करण्यापूर्वी तिची खात्री करण्याचा संदेश देण्यात आला.

कु. श्रावणी कावळे, कु. मधुरा पुंडे आणि कु. रुद्र सुतार यांनी मोबाईलचा अयोग्य वापर, सोशल मीडिया फसवणूक आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहारातील धोके याबाबत मार्गदर्शन केले. सायबर फसवणूक झाल्यास तक्रार कुठे आणि कशी करावी, याचीही माहिती उपस्थितांना देण्यात आली.

कविता आणि गीतातूनही जागृती

सायबर वॉरियर क्लबचे अध्यक्ष कु. रुद्र सुतार यांनी स्वतः लिहिलेल्या कवितेतून सायबर सुरक्षेचा संदेश दिला. तर कु. प्रणोती सुतार हिने ‘माझी म्हणू का, ही आलेली लिंक माझी म्हणू का’ या गीतातून ऑनलाइन फसवणुकीबाबत जनजागृती केली. या सादरीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कु. अश्विनी मुळीक आणि कु. वसुदा खोत यांनी उपस्थितांना ‘सायबर सेफ शपथ’ दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सायबर वॉरियर क्लबच्या सचिव कु. प्राजक्ता खबरे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. एस. डोनर, IQAC समन्वयक प्रा. डॉ. पी. डी. शिरगावे, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. स्वप्निल पोतदार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

सिंहवाणी विशेष संदेश :
‘एका चुकीच्या क्लिकने मोठे नुकसान होऊ शकते; त्यामुळे लिंक, OTP, पासवर्ड आणि ऑनलाइन व्यवहारांबाबत नेहमी सावध राहा.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button