जिल्हाताज्या घडामोडी

श्री मल्लिकार्जुन डोंगर आडी येथे १३ सप्टेंबरपासून किरणोत्सव

श्री मल्लिकार्जुन डोंगर आडी येथे १३ सप्टेंबरपासून किरणोत्सव

निपाणी / सिंहवाणी ब्युरो :
निपाणी परिसरातील श्री मल्लिकार्जुन डोंगर आडी येथील प्राचीन जागृत स्वयंभू मुख्य शिवलिंगावर १३ सप्टेंबरपासून पारंपरिक किरणोत्सवाला प्रारंभ होणार आहे. सूर्योदयानंतर अवघ्या आठ ते दहा मिनिटांत सूर्यकिरणे थेट शिवलिंगावर पडणार असून, भाविकांसह खगोलप्रेमींसाठी हा अद्भुत खगोलीय सोहळा अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

किरणोत्सवाचे अभ्यासक बाबासाहेब मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३, १४ आणि १५ सप्टेंबर रोजी सूर्योदयानंतर आठ ते दहा मिनिटांत सूर्यकिरणे मुख्य शिवलिंगावर पडतील. १६ सप्टेंबर रोजी काही प्रमाणात किरणे मुख्य शिवलिंगावर पडणार आहेत.

त्यानंतर १७ व १८ सप्टेंबर रोजी सूर्यकिरणे शिवलिंगाच्या साळुंखीवर पडतील. तर १९, २० आणि २१ सप्टेंबर रोजी ही किरणे शक्ती शिवलिंगावर पडणार आहेत. यामध्ये १९ व २० सप्टेंबर हे शक्ती शिवलिंगावरील किरणोत्सवाचे प्रमुख दिवस ठरणार आहेत.

२२ व २३ सप्टेंबरपर्यंत सूर्यकिरणे गाभाऱ्यात राहतील आणि त्यानंतर गाभाऱ्याबाहेर पडतील. सिंह व कन्या राशीतील सूर्याच्या भ्रमणाशी संबंधित या किरणोत्सवाचे खगोलीय महत्त्व असून, भाविक तसेच खगोलप्रेमींनी या दुर्मीळ सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबासाहेब मगदूम यांनी केले आहे.

खगोलशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

या किरणोत्सवाच्या अभ्यासाला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ कै. प्रा. डॉ. आर. व्ही. भोसले तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री कै. डॉ. शिवराम भोजे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे.

या अभ्यासात छायाचित्रकार किसन लोखंडे यांनी सहकारी म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

१३ ते २३ सप्टेंबरदरम्यानचा हा किरणोत्सव श्रद्धा, परंपरा आणि खगोलशास्त्राचा अनोखा संगम ठरणार आहे. त्यामुळे परिसरातील भाविक व खगोलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नैसर्गिक अद्भुत घटनेचा अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button