विवाह सोहळ्यात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश: भराडे कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम; वऱ्हाडी-नातेवाईकांना देशी वृक्षांचे वाटप

विवाह सोहळ्यात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश
भराडे कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम; वऱ्हाडी-नातेवाईकांना देशी वृक्षांचे वाटप
खानापूर / सिंहवाणी ब्युरो :
विवाह सोहळा हा केवळ दोन कुटुंबांना जोडणारा प्रसंग न राहता समाजाला विधायक संदेश देणारा ठरू शकतो, याचा आदर्श भराडे कुटुंबाने घालून दिला.
पांगिरे (ता. भुदरगड) येथील तालुका संघाचे माजी व्हा. चेअरमन राजाराम भराडे यांचे सुपुत्र चि. निलेश राजाराम भराडे व चि. सौ. का. मानसी भापकर यांचा विवाह सोहळा १३ सप्टेंबर रोजी खानापूर येथे उत्साहात पार पडला.
या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित नातेवाईक व मान्यवरांना भेटवस्तूऐवजी देशी वृक्षांची रोपे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे दहावे वंशज व पंढरपूर देवस्थानचे विद्यमान विश्वस्त ह.भ.प. श्री. शिवाजी महाराज मोरे यांच्या शुभहस्ते वृक्षवाटप करण्यात आले.
विवाहासोबतच पर्यावरण संवर्धनाची चळवळ पुढे नेण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. “विवाहाची आठवण कायम ठेवण्यासाठी रोप लावा आणि ते वाढवा”, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर सर, पांगिरे गावचे सरपंच मारुती भराडे सर, देहू गावचे माजी सरपंच संतोष हगवणे, वृक्षमित्र सुभाष पाटील, संग्राम पाटील व सचिन पवार यांच्यासह नातेवाईक व मान्यवर उपस्थित होते.
भराडे कुटुंबाच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.