पालकमंत्री थेट चिखलात शेतीकामात सहभागी : ‘ एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमातून कोल्हापुरात ३०० गावांत साधला संवाद

पालकमंत्री आबिटकर थेट चिखलात शेतीकामात सहभागी :
‘ एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमातून कोल्हापुरात ३०० गावांत साधला संवाद

सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर
बळीराजाच्या समस्या थेट बांधावर जाऊन जाणून घेण्यासाठी आणि प्रशासनासोबतचे अंतर कमी करण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेतलेला ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आजरा तालुक्यातील मसोली येथे पार पडलेल्या या विशेष मोहिमेत पालकमंत्री आबिटकर यांनी स्वतः शेतात उतरून केवळ शेतीकामात सहभागच घेतला नाही, तर शेतकऱ्यांच्या सोबतीने बांधावर बसून अनौपचारिक चर्चाही केली.
पावसाळी हंगामातील भात लावणीची कामे सध्या अंतिम टप्प्यात असताना, पालकमंत्री आबिटकर यांनी सुरेश होडगे यांच्या शेतात भेट दिली. औपचारिकतेचा बुरखा बाजूला सारत त्यांनी थेट भातखाचरात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी स्वतः रोटावेटर चालवत चिखलणी केली आणि त्यानंतर महिला व शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पारंपरिक पद्धतीने भात रोपलावणी व बांधबंदिस्तीच्या कामात प्रत्यक्ष हातभार लावला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आपल्यासोबत चिखलात काम करताना पाहून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.
केवळ शारीरिक श्रम न करता, पालकमंत्री आबिटकर यांनी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शेतात ‘जीवामृत’ तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात राबवली. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जीवामृताचे घटक आणि त्यांचे पिकांवरील फायदे जाणून घेतले. शेतीतील वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी नैसर्गिक शेतीची कास धरणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
काम आटोपल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी गाव परिसरातील शेताच्या बांधावर बसूनच शेतकऱ्यांसोबत झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. या भोजनाच्या वेळी रंगलेल्या गप्पांमधून त्यांनी शासकीय योजनांची अंमलबजावणी, खते आणि बियाण्यांची उपलब्धता, आधुनिक अवजारांची गरज आणि बाजारपेठेतील आव्हाने यांवर सविस्तर चर्चा केली.
या उपक्रमाची व्याप्ती केवळ एका गावाहून न थांबता जिल्ह्यातील ३०० गावांपर्यंत पोहोचली होती. एकाच दिवशी जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर उपस्थित होते. आजरा येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रांताधिकारी हरीश सुळ, तहसीलदार समीर माने, सरपंच चंद्रकांत गुरव यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.
या मोहिमेदरम्यान, ‘मागेल त्याला काजू कलमे’ या योजनेअंतर्गत एक लाख काजू कलमांचे वाटप व लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच सेंद्रिय शेती, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर घ्यायची खबरदारी, पिक स्पर्धा विजेत्यांचे मार्गदर्शन आणि पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमइ) योजनेची माहिती देण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेतल्यास योजनांची आखणी अधिक अचूकपणे करता येते, या हेतूने गेल्या वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत. प्रशासनाने कागदावरची योजना थेट बांधावर नेल्यास बळीराजाला नक्कीच मोठा दिलासा मिळतो, अशी भावना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.
भुदरगड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी हा उपक्रम राबविला गेला त्यामध्ये महाराष्ट्र शासन शेतीमित्र शरद देवेकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनीसहभाग घेतला़