कृषीवार्ताजिल्हाताज्या घडामोडी

शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व रोग नियंत्रणावर भर द्यावा अधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा बांधापर्यंत प्रसार आवश्यक : डॉ. सुनील कराड

शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व रोग नियंत्रणावर भर द्यावा

अधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा बांधापर्यंत प्रसार आवश्यक : डॉ. सुनील कराड

कोल्हापूर / सिंहवाणी ब्युरो :
शेतकऱ्यांनी पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी आयोजित चर्चासत्र, शिवार फेरी आणि शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

डॉ. कराड म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खरचे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कृषी संशोधन केंद्रांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना करण्यात आली आहे. या मंचाच्या माध्यमातून दर महिन्याला सदस्यांसाठी चर्चासत्रे आणि प्रशिक्षण आयोजित केले जाते. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आत्माच्या प्रकल्प संचालक श्रीमती रक्षा शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दर महिन्याला आयोजित करण्यात येणाऱ्या अशा विस्तार कार्यक्रमांमुळे कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.

रोग व कीड व्यवस्थापनावर तांत्रिक मार्गदर्शन

कार्यक्रमातील तांत्रिक सत्रात खरीप पिकांवरील रोग व्यवस्थापन या विषयावर डॉ. रविंद्र करंडे यांनी, तर एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर श्री. नितीश घोडके यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन करण्यात आले.

यावेळी शेतीमित्र शरद देवेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास विभागीय कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. शैलेश कुंभार, डॉ. योगेश बन, डॉ. संभाजीराव जाधव, श्री. सागर शेळके, श्रीमती शितल देशमुख, श्रीमती मंगल भोसले, श्री. अनिकेत बोरचाटे, डॉ. मयूर सुतार तसेच श्री. बाळासाहेब पाटील, श्री. सर्जेराव पाटील, श्री. मच्छिंद्र कुंभार आणि श्री. आप्पासाहेब पाटील यांच्यासह मंचाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण गजभिये यांनी केले. आभार डॉ. योगेश बन यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. सुहास भिंगारदेवे यांनी केले.

सिंहवाणी विशेष :
कृषी संशोधन केंद्र आणि शेतकरी यांच्यातील थेट संवादातून आधुनिक तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कीड व रोग व्यवस्थापनाचे शास्त्रीय तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button