जंगमहट्टीच्या १७ वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह तिलारीनगरच्या दरीत फेकल्याचा संशय प्रेमसंबंधाच्या रागातून घातपात; सोशल मीडियावरील बनावट अकाउंटद्वारे बोलावून घेतल्याचा पोलिसांचा दावा; तिघांना अटक

जंगमहट्टीच्या १७ वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह तिलारीनगरच्या दरीत फेकल्याचा संशय
प्रेमसंबंधाच्या रागातून घातपात; सोशल मीडियावरील बनावट अकाउंटद्वारे बोलावून घेतल्याचा पोलिसांचा दावा; तिघांना अटक
चंदगड / सिंहवाणी ब्युरो :
जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील हर्षद प्रकाश हुंदळेकर (वय १७) या बारावीच्या विद्यार्थ्याचा प्रेमसंबंधाच्या रागातून खून करून मृतदेह तिलारीनगर येथील स्वप्नवेल पॉईंटच्या खोल दरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदगड पोलिसांनी कीर्तीकुमार रामू कुट्रे (वय २८), दिलीप उर्फ लहू लक्ष्मण कुट्रे (वय २९) आणि श्रीनाथ मधुकर नागुर्डेकर (वय २४) या तिघांना अटक केली आहे. तिघांनी खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधावरून कीर्तीकुमार कुट्रे याच्या मनात हर्षदविषयी राग होता. त्यातूनच हर्षदला संपविण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय आहे.
बनावट सोशल मीडिया अकाउंटद्वारे सापळा
शनिवारी रात्री सोशल मीडियावरील एका बनावट अकाउंटचा वापर करून हर्षदला पार्ले येथे बोलावून घेण्यात आले. हर्षद घरातून बाहेर पडताना एका मित्रासोबत दुचाकीवरून निघाला होता. मात्र, काही अंतर गेल्यानंतर हर्षदच्या मोबाईलवर ‘तू एकटाच ये’ असा संदेश आला. त्यानुसार त्याने मित्राला थांबवून एकट्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
पार्ले गावच्या हद्दीत हर्षद पोहोचल्यानंतर कीर्तीकुमार कुट्रे व त्याच्या दोन साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात हर्षदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृतदेह मोटारीतून तिलारीनगरला नेल्याचा दावा
हल्ल्यानंतर उशिरा रात्री हर्षदचा मृतदेह मोटारीतून तिलारीनगर येथील स्वप्नवेल पॉईंट परिसरात नेण्यात आला. तेथे असलेल्या खोल दरीत मृतदेह फेकून दिल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिलारीनगर परिसरात शोधमोहीम राबविली. मात्र, दरी अत्यंत खोल आणि तीव्र उताराची असल्याने पोलिसांना अद्याप मृतदेह सापडलेला नाही.
आज पुन्हा शोधमोहीम; सावंतवाडी रेस्क्यू टीमची मदत
मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरीची भौगोलिक परिस्थिती अत्यंत अवघड असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. ३ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने विशेष शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दरम्यान, हर्षद हा बारावीमध्ये शिक्षण घेत होता. अवघ्या १७व्या वर्षी त्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने जंगमहट्टी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हर्षदच्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, आजी आणि आजोबा असा परिवार आहे.
पोलिस तपासाकडे लक्ष
या प्रकरणात प्रेमसंबंधाचा नेमका संदर्भ काय होता, खुनामागील कारण किती व्यापक आहे, तसेच या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास चंदगड पोलिसांकडून सुरू आहे. संशयितांच्या कबुलीजबाबाच्या आधारे पोलिसांनी घटनाक्रमाची पडताळणी सुरू केली असून, मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणातील पुढील तपासाला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.
पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील आणि पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.