जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरदिवसा बिबट्याचा थरार! कारीवडे येथे दोन शेतकऱ्यांवर झडप; एक गंभीर म्हशीवरही हल्ला; शेतकऱ्यांमध्ये दहशत, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

भरदिवसा बिबट्याचा थरार! कारीवडे येथे दोन शेतकऱ्यांवर झडप; एक गंभीर

म्हशीवरही हल्ला; शेतकऱ्यांमध्ये दहशत, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची  मागणी

गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :
भुदरगड तालुक्यातील कारीवडे येथे भरदिवसा बिबट्याने दोन शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची थरारक घटना सोमवारी घडली. जनावरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांसमोर अचानक बिबट्या आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात पांडुरंग शंकर देसाई (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असून यशवंत शिवा देसाई हेही जखमी झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात एका म्हशीलाही दुखापत झाली आहे.

कारीवडे येथील पांडुरंग देसाई आणि यशवंत देसाई हे सोमवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ‘मळी’ परिसरातील शेतात जनावरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एका म्हशीवर झडप घातली.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. म्हशीला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मात्र, म्हशीवर हल्ला केल्यानंतर बिबट्याने दोन्ही शेतकऱ्यांकडे मोर्चा वळवत त्यांच्यावरही झडप घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी यशवंत देसाई यांनी प्रसंगावधान राखत कसाबसा बिबट्याच्या तावडीतून स्वतःचा बचाव केला. मात्र, पांडुरंग देसाई यांच्यावर बिबट्याने जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांच्या कानाला, उजव्या हाताला तसेच चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. हल्ल्यामुळे ते रक्तबंबाळ झाले.

दरम्यान, बिबट्याने म्हशीवरही हल्ला केल्याने ती जखमी झाली आहे. भरदिवसा शेतात घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांची घटनास्थळी धाव

हल्ल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग देसाई यांना तातडीने गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

वनविभागाकडून पाहणी; सतर्कतेचे आवाहन

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. या भागात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी विशेषतः शेतकरी व पशुपालकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भरदिवसा शेतात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने कारीवडे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर नेमका कुठे आहे, याचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त होईपर्यंत शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात न जाता समूहाने जाणे, झुडपांच्या परिसरात विशेष काळजी घेणे आणि जनावरांना चारण्यासाठी नेताना सतर्क राहणे गरजेचे बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button