जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रक्षाबंधनातून ‘ड्रग्समुक्तीचे बंधन’: नशामुक्त भारत अभियानांतर्गत विशाल अग्रवाल यांचे आवाहन

रक्षाबंधनातून ‘ड्रग्समुक्तीचे बंधन’
नशामुक्त भारत अभियानांतर्गत विशाल अग्रवाल यांचे आवाहन

हिंगोली / सिंहवाणी ब्युरो :
रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव न राहता व्यसनांच्या विळख्यातून नव्या पिढीचे संरक्षण करण्याचा सामाजिक संकल्प ठरावा, असे आवाहन नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी तथा महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल यांनी केले.

नशामुक्त भारत अभियानांतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आयुक्तालय, हिंगोली, जिल्हा समाजकल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रक्षाबंधन-२०२६ : ड्रग्समुक्तीचे बंधन’ हा उपक्रम हिंगोली येथे राबविण्यात आला. यावेळी व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी विविध उपक्रमांचा संकल्प करण्यात आला.

अग्रवाल म्हणाले, रक्षाबंधन हा सहकार्य, सुरक्षा आणि संरक्षण या मानवतावादी मूल्यांची जपणूक करणारा सण आहे. त्याच भावनेतून नवोदित पिढी, युवती आणि महिलांना तंबाखूजन्य पदार्थ, घातक अमली पदार्थ तसेच विविध व्यसनांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.

‘व्यसनांपासून व्यसनबाधितांचे संरक्षण’ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि त्यासाठी सातत्यपूर्ण कृती आराखडा राबवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रबोधनात्मक समुपदेशनाची गरज

ग्रामीण भागातील नव्या पिढीमध्ये व्यसनांचे वाढते दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रबोधनात्मक समुपदेशनाची मोठी गरज आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय समितीसेवा पुरस्कारार्थी मदनभाई येवले, वाशीम यांनी सांगितले.

तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी शाळा, महाविद्यालये, पालक आणि सामाजिक संस्थांनी सातत्याने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्यसनमुक्ती केंद्रांची भूमिका महत्त्वाची

व्यसनाधीन व्यक्तींना पुन्हा सामान्य जीवनाच्या प्रवाहात आणण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांची भूमिका महत्त्वाची असल्याचे व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे संस्थापक-संचालक गणेश वानखेडे, सावळा-बुलढाणा यांनी सांगितले.

‘ड्रग्समुक्तीचे बंधन… राष्ट्राचे रक्षण’ हा उपक्रम वर्षभर राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

स्वप्न मोठे ठेवा, व्यसनांपासून दूर राहा’

निरामय जीवन, व्यसनमुक्त कुटुंब आणि समर्थ भारतासाठी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन नशामुक्त भारत अभियानाच्या सखी तथा वैद्यकीय मानसतज्ज्ञ इला मेश्राम, चंद्रपूर यांनी केले.

“स्वप्न मोठे ठेवा, मेहनत प्रामाणिकपणे करा; यश नक्कीच तुमचे असेल,” असा संदेश त्यांनी सामाजिक माध्यमातून दिला. व्यसनमुक्त जीवनाचे फायदे आणि त्यातून मिळणाऱ्या आरोग्यदायी भविष्याची माहितीही त्यांनी दिली.

विद्यार्थिनींनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

हिंगोली येथील दयानंद एज्युकेशन सोसायटीच्या महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘ड्रग्समुक्त महाराष्ट्र’ निर्मितीसाठी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली.

यावेळी सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयाच्या प्राचार्या एम. एस. गुंडेकर, माणिक स्मारक आर्य विद्यालयाचे मुख्याध्यापक के. एस. राठोड, सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांच्यासह शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान व्यसनमुक्ती प्रबोधनपर पत्रकांचे वितरण करण्यात आले. तसेच नशाबंदी मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले व्यसनमुक्तीविषयक चित्रप्रदर्शनही आयोजित करण्यात आले.

रक्षाबंधनाचा संदेश : नात्याबरोबरच समाजरक्षणाचाही संकल्प

राखीच्या बंधनातून केवळ भावाच्या संरक्षणाची भावना नव्हे, तर तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यातून वाचवण्याचा सामाजिक निर्धार व्यक्त झाला. ‘ड्रग्समुक्त जीवन’ हा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button