प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत राज्यस्तरावर दिमाखदार कामगिरी

प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत राज्यस्तरावर दिमाखदार कामगिरी
कोल्हापूर / सिंहवाणी ब्युरो :
महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी विश्वकोश ऑनलाइन ज्ञानवर्धन स्पर्धेत प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन केले. शहरी विभागातून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची राज्यस्तरावर छाप उमटवली.
राज्यस्तरीय स्पर्धेत कु. पाटील सम्राज्ञी शिवाजी हिने चौथा क्रमांक पटकावत ७ हजार ५०० रुपये रोख व प्रमाणपत्र, तर कु. कीर्ती परशुराम चव्हाण हिने पाचवा क्रमांक मिळवत ५ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र प्राप्त केले.
जिल्हास्तरावरही प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. कु. ढोबळे सई सागर व कु. मुडशिंगीकर काव्या कैलास यांनी प्रथम क्रमांक मिळवत प्रत्येकी ३ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र मिळवले. तर इंग्रोळे अर्णव अश्विनकुमार याने द्वितीय क्रमांक पटकावत २ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र मिळवले.
याशिवाय कु. पाटील सारंगी लालासो, कु. सरवदे सानिका सुधीर, कु. पोळ अर्चिता धनंजय आणि सूर्यवंशी शाश्वत विष्णू यांनीही स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवत सहभाग प्रमाणपत्र मिळवले.
या यशामागे विद्यार्थ्यांना मराठी विभागप्रमुख श्री. ए. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सौ. शेरखाने मॅडम व सौ. शिंत्रे मॅडम यांनी सहकार्य केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जी. एस. जांभळीकर, उपमुख्याध्यापक श्री. पी. एम. जोशी, पर्यवेक्षक श्री. गानबावले, जिमखाना प्रमुख श्री. डी. सी. पाटील व श्री. पी. एस. जाधव यांचेही विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन मिळाले.
ठाण्यात दिमाखात पारितोषिक वितरण
विजेत्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक, उद्योग व मराठी भाषा विकास मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक श्री. मधु मंगेश कर्णिक यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वाचनाची गोडी, ज्ञानाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणाऱ्या या स्पर्धेत राज्यस्तरावर मिळविलेले यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.