ताज्या घडामोडीमहाराष्ट्रविशेष

पुण्यात राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम; विद्यार्थिनींच्या प्रश्नांना दिला आवाज महिलांना देशाची सर्वात मोठी ताकद संबोधत शिक्षण, सुरक्षितता, समानता आणि स्वावलंबनावर भर

पुण्यात राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम; विद्यार्थिनींच्या प्रश्नांना दिला आवाज

महिलांना देशाची सर्वात मोठी ताकद संबोधत शिक्षण, सुरक्षितता, समानता आणि स्वावलंबनावर भर

पुणे / सिंहवाणी ब्युरो :
काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात शनिवारी (२२ ऑगस्ट) ‘छात्रों की गूंज’ हा विशेष संवाद कार्यक्रम पार पडला. विद्यार्थिनी आणि तरुण महिलांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम प्रामुख्याने विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आला होता. शिक्षण, महिला सुरक्षा, समानता, स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधी यांसह युवकांशी संबंधित विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.

राहुल गांधी यांनी आपल्या संवादात महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत महिलांना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन केले. महिलांमध्ये संवेदनशीलता, जिद्द, समजूतदारपणा आणि पुढे जाण्याची क्षमता मोठी असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांना केवळ त्यांच्या कौटुंबिक किंवा सामाजिक संबंधांवरून न पाहता त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातून ओळख मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनुस्मृतीच्या संदर्भातून टीका

महिलांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी मनुस्मृतीचा संदर्भ देत तिच्यात महिलांना स्वतंत्र न ठेवण्याची मानसिकता असल्याची टीका केली. महिलांवर सामाजिक बंधने लादण्याऐवजी त्यांना शिक्षण, निर्णयक्षमता आणि समान संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात सहभागी विद्यार्थिनींनीही आपले अनुभव आणि प्रश्न राहुल गांधी यांच्यासमोर मांडले. महिला सुरक्षितता, छेडछाड, शिक्षणातील अडचणी, स्पर्धा परीक्षांची तयारी, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक दबाव यांसारख्या विषयांवर विद्यार्थिनींनी संवाद साधला. युवकांच्या प्रश्नांना थेट ऐकून घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कडेकोट सुरक्षा; पोलिसांच्या ३० अटी

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आयोजकांना ३० अटींसह परवानगी दिली होती. कार्यक्रमस्थळी कायदा व सुव्यवस्था राखणे, आक्षेपार्ह चित्रे किंवा बॅनर न लावणे तसेच धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कार्यक्रमासाठी सुमारे ८ ते १० हजार नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यामुळे काँग्रेसच्या युवक संपर्क अभियानालाही वेग आला आहे. ‘छात्रों की गूंज’ ही देशातील विविध शहरांमध्ये युवकांशी संवाद साधण्यासाठी सुरू असलेल्या मालिकेतील पुण्यातील पुढची कडी आहे. यापूर्वी कोटा, डेहराडून आणि प्रयागराज येथे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, कार्यक्रमाच्या आधी पुण्यातील एका वसतिगृह परिसरात ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली होती.

राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यामुळे विद्यार्थिनींचे प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि युवकांपर्यंत राजकीय पक्षांचा थेट संवाद या मुद्द्यांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले आहे. त्यामुळे ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाकडे आगामी राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या दृष्टीनेही लक्ष वेधले जात आहे.

— सिंहवाणी लाईव्ह न्यूज
संपादक : किशोर आबिटकर (ज्येष्ठ पत्रकार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button