बाळूमामा देवस्थान गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा! उबाठा शिवसेनेचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा; दोषी विश्वस्तांच्या मालमत्तेची चौकशी व अटकेची मागणी

बाळूमामा देवस्थान गैर व्यवहाराची SIT चौकशी करा! उबाठा शिवसेनेचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा
दोषी विश्वस्तांच्या मालमत्तेची चौकशी व अटकेची मागणी
गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :
आदमापूर (ता. भुदरगड) येथील श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थानातील कथित कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी, दोषी विश्वस्तांवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी, तसेच संबंधित विश्वस्तांच्या मालमत्तेची चौकशी करावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी जोरदार मोर्चा काढण्यात आला.
हुतात्मा स्मारक येथून निघालेला हा मोर्चा आजरा-भुदरगड उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी हरेश सुळ यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
देवस्थानातील कथित गैरव्यवहाराबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होऊन एक महिना उलटला आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून तक्रारीत उल्लेख असलेल्या रागिणी खडके व सचिव रावसाहेब कोणकेरी यांना अद्याप अटक झालेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. प्रकरणातील सर्व संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंदे म्हणाले, “देवस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे सर्व विश्वस्तांच्या मालमत्तेची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांना तात्काळ अटक करावी. तसेच लंबे समितीचा अहवाल तातडीने सादर करावा.”
उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व संभाजी पाटील यांनीही दोषींना तात्काळ अटक करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
मोर्चात तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, कृष्णा डाकरे, युवराज पोवार, जयसिंग टिकले, मेरी डिसोझा, मारुती पुरीबुवा, शरद वैराट, अशोक पाटील, अवधूत पाटील, थॉमस डिसोझा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चानंतर प्रांताधिकारी हरेश सुळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
“प्रशासन संबंधितांना पाठीशी घालत आहे का?”
तालुकाप्रमुख अविनाश शिंदे म्हणाले, “देवस्थान समितीच्या नुकत्याच झालेल्या निवड बैठकीला कथित गैरव्यवहार प्रकरणातील सचिव रावसाहेब कोणकेरी उपस्थित राहतात. मग पोलिसांना ते सापडत का नाहीत? प्रशासन या प्रकरणातील संबंधितांना पाठीशी घालत आहे का, अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे.”
फोटो
आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान गैरव्यवहार प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी हरेश सुळ यांना देताना शिवसेनेचे पदाधिकारी.
