NTA ने पुन्हा दिवे लावलेत! UGC-NET इंग्रजी, कॉमर्स व समाजशास्त्राची फेरपरीक्षा; NTAकडून परीक्षा काढून घेण्याची मागणी

NTA ने पुन्हा दिवे लावलेत!
UGC-NET इंग्रजी, कॉमर्स व समाजशास्त्राची फेरपरीक्षा; NTAकडून परीक्षा काढून घेण्याची मागणी
सिंहवाणी ब्युरो / नवी दिल्ली :
UGC-NET जून २०२६ परीक्षेतील गंभीर त्रुटी अखेर NTAच्या लक्षात आल्या असून, इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे जूनमध्ये परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.
NTAच्या समितीने प्रश्नपत्रिकांची तपासणी केली असता तथ्यात्मक, मुद्रण, भाषांतर, व्याकरण, प्रश्नरचना तसेच यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांची पुनरावृत्ती अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे केवळ चुकीचे प्रश्न वगळून निकाल लावणे योग्य ठरणार नसल्याचे समितीने स्पष्ट केले.
इंग्रजी आणि कॉमर्स विषयांची फेरपरीक्षा ९ सप्टेंबर २०२६, तर समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा १० सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
दरम्यान, या प्रकारावर NET, SET, Ph.D. धारक संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. जोतीराम बाबुराव सोरटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असलेल्या परीक्षेत एवढ्या गंभीर चुका होणे आणि त्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी फेरपरीक्षेचा निर्णय घेणे ही विद्यार्थ्यांची थट्टा आहे. केंद्र सरकारने NTAकडून महत्त्वाच्या परीक्षा काढून घेऊन स्वतंत्र, पारदर्शक आणि जबाबदार परीक्षा यंत्रणा निर्माण करावी,” अशी मागणी प्रा. सोरटे यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या त्रुटींमुळे NTAच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.