नागणवाडीत नागपंचमी उत्साहात; हजारो भाविकांनी घेतले श्री नागनाथांचे दर्शन

नागणवाडीत नागपंचमी उत्साहात; हजारो भाविकांनी घेतले श्री नागनाथांचे दर्शन
पिंपळगाव / सिंहवाणी ब्युरो :
चिकोत्रा खोऱ्यातील नागणवाडी (ता. भुदरगड) येथील जागृत देवस्थान श्री नागनाथ मंदिरात नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. नागणवाडी तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी श्री नागनाथांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
सालाबादप्रमाणे यंदाही नागपंचमीच्या दिवशी पहाटे श्री नागनाथ देवाला अभिषेक व होमपूजा करण्यात आली. त्यानंतर सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. रात्री तमानाकवाडा (ता. कागल) येथील भजनी मंडळाचा भक्तिमय कार्यक्रम झाला.
दिवसभर मंदिर परिसरात हरिनाम भजनाचा गजर सुरू होता. महिलांनी गीत, झिम्मा-फुगडी, कटवडखाना आदी पारंपरिक कार्यक्रम सादर करून उत्सवाची रंगत वाढवली. सकाळी दहा वाजल्यापासून उपवास करणाऱ्या भाविकांसाठी खिचडी, दही व राजगिरा लाडू असा प्रसाद ठेवण्यात आला होता. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या उत्सवासाठी पिंपळगाव, पांगिरे, हेळेवाडी, बामणे, बारवे, दिंडेवाडी यांसह चिकोत्रा खोऱ्यातील विविध गावांमधून तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते. नागणवाडीच्या माहेरवाशिणींनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री नागनाथांचे दर्शन घेतले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी येथील नागरिकांचीही विशेष उपस्थिती होती.
उत्सवाच्या आयोजनासाठी सरपंच स्मिता परीट, माजी सरपंच अशोक साळोखे, तानाजी कदम, उपसरपंच दिलीप कदम, पोलीस पाटील सहदेव साळोखे, महादेव साळोखे, सेवानिवृत्त कॅप्टन अजय साळोखे, अमर पन्हाळकर, विलास साळोखे, विलास पन्हाळकर, अविनाश साळोखे, उदय पन्हाळकर, वैभव साळोखे, अशोक मगदूम, अशोक कदम, पांडुरंग साळवी, संभाजी साळोखे, मोहन शेवाळे, मोहन साळवी, दयानंद शेवाळे, चंद्रकांत साळोखे, सचिन सुतार यांच्यासह अजिंक्यतारा कला-क्रीडा मंडळाचे सदस्य, विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते, महिला बचत गटांच्या सदस्या, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
पोलिसांचे सहकार्य
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर नागणवाडी येथे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, हवालदार स्वप्निल मोरे, कॉन्स्टेबल कांबळे, चालक साळोखे आदींनी भेट देऊन उत्सवाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा नागणवाडीतील नागपंचमी उत्सव यंदाही उत्साहात पार पडला.