गारगोटीत चित्र-शिल्प प्रात्यक्षिकाचा उपक्रम सुरू करणार कला शिक्षक प्रशांत जाधव यांची माहिती

गारगोटीत चित्र-शिल्प प्रात्यक्षिकाचा उपक्रम सुरू करणार
कला शिक्षक प्रशांत जाधव यांची माहिती
गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :
कोल्हापूर जिल्ह्यातील चित्रकला व शिल्पकलेची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी गारगोटी येथे चित्र प्रदर्शन, शिल्प प्रात्यक्षिक आणि संगीताचा अनोखा संगम असलेला उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कला शिक्षक प्रशांत जाधव यांनी दिली.
सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. अशोक सुतार यांच्या नेतृत्वाखाली दहा चित्रकारांचा समूह गारगोटी येथे आला होता. के. डी. देसाई कॉलनीतील गुलमोहर आर्ट गॅलरी येथे झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील चित्रकला व शिल्पकलेची परंपरा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे कशी पोहोचविता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस ज्येष्ठ चित्रकार शिवाजी म्हस्के, सुनील पंडित, राजेंद्र हंकारे, विजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर, कला शिक्षक प्रशांत जाधव तसेच श्री. चांदणे आदी उपस्थित होते.
गारगोटी येथे चित्र प्रदर्शनासोबत शिल्पकलेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. तसेच गडहिंग्लज, गारगोटी, आजरा, शाहूवाडी, करवीर, हातकणंगले आदी भागांत ज्येष्ठ चित्रकारांच्या व्याख्यानांसह चित्रकला व शिल्पकलेची प्रात्यक्षिके आयोजित करून कला प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चित्रकला आणि शिल्पकलेची आवड विद्यार्थ्यांमध्ये व नव्या पिढीत निर्माण व्हावी, तसेच स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे जाहीर केले. त्यामुळे गारगोटी आणि परिसरातील कला क्षेत्राला या उपक्रमातून नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.