ताज्या घडामोडी

हत्तरगीत गोकुळाष्टमी उत्सवात आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा ६० हजारांची रोख पारितोषिके; ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक व सांगीतिक कार्यक्रम

हत्तरगीत गोकुळाष्टमी उत्सवात आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा

६० हजारांची रोख पारितोषिके; ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक व सांगीतिक कार्यक्रम 

गडहिंग्लज / सिंहवाणी ब्युरो :
हत्तरगी (जि. बेळगाव) येथील पुरातन श्री हरीकाका गोसावी भागवत मठात गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे यंदाचे सहावे वर्ष असून, यानिमित्त आंतरराज्य भव्य संगीत भजन सम्राट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटकातील भजनी मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पीठाधीश डॉ. आनंद गोसावी महाराज यांनी केले आहे.

४ सप्टेंबरला भजन स्पर्धेला प्रारंभ
४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंतरराज्य संगीत भजन स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास २१ हजार १ रुपयांचे रोख पारितोषिक व मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास १० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी एकूण १४ हजार रुपयांची रक्कम ठेवण्यात आली आहे. सहभागी सर्व संघांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

प्रत्येक भजनी मंडळाला सादरीकरणासाठी १८ मिनिटांचा वेळ देण्यात येणार असून, या कालावधीत किमान दोन अभंग व एक गवळण सादर करणे आवश्यक आहे. अभंग व गवळणी संत रचित तथा संतांच्या गाथेतील असाव्यात. सादरीकरणातील अभंग रचना मराठी किंवा कन्नड भाषेतील असणे आवश्यक आहे.

कृष्ण जन्मसोहळा व नारदीय कीर्तन
४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता सांगली येथील सौ. स्वरदा पटवर्धन हरिदास यांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्मसोहळा व नारदीय कीर्तन होणार आहे.

५ सप्टेंबर रोजी पारणे, प्रवचन व भजनाचे कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील यांची भक्तिसंगीत गायन सेवा होणार आहे. तसेच विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माण (ता. शाहूवाडी) येथून निघालेल्या आनंद पायी दिंडीचे हत्तरगी येथे आगमन होणार आहे.

६ सप्टेंबरला गोपाळकाला व महाप्रसाद
६ सप्टेंबर रोजी दुपारी विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर गोपाळकाला व महाप्रसाद वाटप होणार आहे.

भजनी मंडळांनी ३१ ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी

आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भजनी मंडळांनी ३१ ऑगस्टपर्यंत श्री हरी मंदिर, हत्तरगी, जिल्हा बेळगाव येथे आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. गोकुळाष्टमी उत्सवातील या भव्य भजन स्पर्धेला महाराष्ट्र व कर्नाटकातील भजनी मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही आयोजकांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button