ऊर्जा संवर्धन प्रश्नमंजुषा स्पर्धेत गारगोटी हायस्कूलचे दैदिप्यमान यश विद्यार्थ्यांनी पटकावले ७० हजार रुपयांचे रोख पारितोषिक

ऊर्जा संवर्धन प्रश्नमंजुषा स्पर्धेत गारगोटी हायस्कूलचे दैदिप्यमान यश
विद्यार्थ्यांनी पटकावले ७० हजार रुपयांचे रोख पारितोषिक
गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ‘ऊर्जा संवर्धन व अपारंपरिक ऊर्जा विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा–२०२६’ मध्ये गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, गारगोटीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या घवघवीत कामगिरीबद्दल शाळेला तब्बल ७० हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्राप्त झाले आहे.
ऊर्जा संवर्धन, अपारंपरिक ऊर्जास्रोत, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि ऊर्जाविषयक जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक संस्कार महादेव पाटील याने पटकावला. द्वितीय क्रमांक सिद्धोजी दिलीप खोराटे, सोहम सुनील पाटील, समर्थ अरविंद पोंटके आणि सहर्ष दीपक राणे यांनी संयुक्तरीत्या मिळविला. तर तृतीय क्रमांक वर्धन राजाराम खोत, वेदांत भैरवनाथ कोकाटे आणि स्वराज सतीश पाटील यांनी मिळविला.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मिलिंद पांगिरेकर यांचे प्रोत्साहन, तर युवराज शिगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ऊर्जा संवर्धनाचा संदेश देत ज्ञान, चिकाटी आणि संघभावनेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश गारगोटी हायस्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा ठरले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे आणि शाळा प्रशासनाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.