ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठी व्याकरणाचा ज्ञानकोश हरपला; डॉ. यास्मिन शेख यांचे १०१व्या वर्षी निधन मराठी भाषेच्या शुद्धलेखन, व्याकरण आणि प्रमाणभाषेच्या संवर्धनासाठी आयुष्य समर्पित;

मराठी व्याकरणाचा ज्ञानकोश हरपला; डॉ. यास्मिन शेख यांचे १०१व्या वर्षी निधन

मराठी भाषेच्या शुद्धलेखन, व्याकरण आणि प्रमाणभाषेच्या संवर्धनासाठी आयुष्य समर्पित;

पुणे / सिंहवाणी ब्युरो :
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ, मराठी व्याकरणाच्या अभ्यासक आणि मराठी भाषेच्या शुद्धलेखन व प्रमाणभाषेच्या संवर्धनासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या डॉ. यास्मिन शेख यांचे वयाच्या १०१व्या वर्षी वृद्धापकाळाने सोमवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी भाषा, साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा दुवा हरपला आहे. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील बाणेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

जन्माने ज्यू, कर्माने अस्सल मराठी

डॉ. यास्मिन शेख यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरूषा रूबेन होते. त्या मूळच्या ज्यू समाजातील होत्या. पुढे अझीझ शेख यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या यास्मिन शेख म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि महाराष्ट्राशी असलेली त्यांची नाळ इतकी घट्ट होती की, त्यांनी मराठी भाषेच्या अभ्यासाला आणि संवर्धनाला आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.

“जन्माने ज्यू, पण कर्माने अस्सल मराठी” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

‘भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा’

भाषा हा समाजाचा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे आणि तो जपणे ही मराठी माणसांची जबाबदारी आहे, ही भूमिका डॉ. यास्मिन शेख सातत्याने मांडत होत्या. त्यांच्या मते भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून इतिहास, संस्कृती, परंपरा, विचार आणि समाजाची सामूहिक स्मृती जपणारे माध्यम आहे.

मराठी व्याकरणाचे नियम कठीण किंवा केवळ अभ्यासकांपुरते मर्यादित न ठेवता ते सोप्या, स्पष्ट आणि सर्वसामान्यांना समजतील अशा पद्धतीने मांडणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते.

मराठी लेखनाला दिशा देणारी पुस्तके

मराठी भाषेच्या अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण साहित्यनिर्मिती केली. त्यांची प्रमुख पुस्तके म्हणून—

– मराठी लेखन मार्गदर्शिका
– मराठी शब्दलेखन कोश
– सुगम मराठी व्याकरण लेखन कोश

या ग्रंथांचा विशेष उल्लेख केला जातो. मराठीचे शुद्धलेखन, व्याकरण, शब्दरचना आणि प्रमाणलेखन याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या या पुस्तकांना मराठी लेखनासाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ मानले जाते.

भाषेतील बदलांना विरोध नव्हे; विवेकपूर्ण बदलाचा आग्रह

यास्मिनबाईंचा भाषाशुद्धतेचा आग्रह म्हणजे भाषा बदलू नये किंवा नव्या शब्दांना मराठीत स्थान मिळू नये, असा नव्हता. भाषा ही प्रवाही आहे आणि काळानुसार तिच्यात बदल होत राहतात, हे त्यांनी मान्य केले.

मात्र भाषेत नवे शब्द आणि नवे प्रवाह स्वीकारताना भाषेची मूळ रचना, बाज आणि प्रमाणभाषेचे भान टिकले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. बोलीभाषा समृद्ध व्हावी; परंतु त्याचवेळी मराठी भाषिकांना प्रमाणभाषा उत्तम प्रकारे बोलता, वाचता आणि लिहिता आली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती.

विविध पुरस्कारांनी सन्मान

मराठी भाषेच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

नुकत्याच झालेल्या १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात पुणे येथे त्यांचा सत्कार करण्यात आला होता. आयुष्याच्या शतकपूर्तीनंतरही मराठी भाषेच्या अभ्यासासाठी आणि मार्गदर्शनासाठी त्यांची असलेली निष्ठा यावेळी विशेषत्वाने अधोरेखित झाली.

भाषेवर प्रेम म्हणजे तिच्याशी प्रामाणिक राहणे

आज डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडियामुळे प्रत्येक व्यक्तीच्या हातात लिहिण्याचे माध्यम आले आहे. मात्र भाषेचे शुद्धलेखन, योग्य उच्चार आणि व्याकरण याबाबतचा काटेकोरपणा कमी होत असल्याची खंत व्यक्त केली जाते. अशा काळात यास्मिनबाईंचे कार्य अधिक महत्त्वाचे ठरते.

भाषेचा बदल हा अपरिहार्य आहे; पण भाषेचा बदल आणि भाषेवरील प्रभुत्व गमावणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हा त्यांच्या कार्यातून मिळणारा महत्त्वाचा संदेश आहे.

त्यांच्या निधनाने केवळ एक ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेल्या नाहीत, तर मराठी भाषेवर प्रेम करणे म्हणजे तिची रचना, शिस्त आणि अभिव्यक्तीची ताकद जपणे, असा आग्रह धरणाऱ्या एका पिढीतील महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

मराठी व्याकरणाचा हा ज्ञानकोश हरपल्याने साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. यास्मिन शेख यांना सिंहवाणी परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button