मातृतीर्थ कुंडात भाविकाचा बुडून मृत्यू : सहा तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर मृतदेह हाती; परिक्रमा यात्रेसाठी माहूरगडावर आलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत

मातृतीर्थ कुंडात भाविकाचा बुडून मृत्यू
सहा तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर मृतदेह हाती;
परिक्रमा यात्रेसाठी माहूरगडावर आलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत
संजय घोगरे, माहूर / सिंहवाणी ब्युरो :
नारळी पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र माहूरगडावर सुरू असलेल्या पंचक्रोशी परिक्रमा यात्रेदरम्यान मातृतीर्थ कुंडात बुडून वाशिम जिल्ह्यातील २८ वर्षीय भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनिकेत वाल्मीक तुरक (वय २८, रा. गायवळ, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) असे मृत भाविकाचे नाव आहे. शुक्रवारी, दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
अनिकेत तुरक हे आपल्या बहिणीसह गावातील अन्य भाविकांसोबत क्रूझर वाहनाने गुरुवारी सायंकाळी माहूरगडावर दाखल झाले होते. श्री दत्तशिखर संस्थानासह परिक्रमा मार्गावरील २६ ठिकाणांचे दर्शन घेत त्यांनी पायी परिक्रमा पूर्ण केली. त्यानंतर वाहन पार्किंगच्या ठिकाणी आल्यानंतर आंघोळ करण्यासाठी ते मातृतीर्थ कुंडाकडे गेले.
कुंडात पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर काही वेळातच अनिकेत पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात आले. घटनास्थळी तैनात असलेल्या जीवरक्षक दलाच्या जवानांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काठावरील पायऱ्यांपासून सुमारे दहा फूट अंतरावर असतानाच त्यांचा दम संपला आणि ते खोल पाण्यात बुडाले. कुंडातील खोल गाळात ते रुतल्याने बचाव पथकाला तत्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभिजीत जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मुख्याधिकारी विवेक कांदे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, नायब तहसीलदार कैलास जेठे, तलाठी चंद्रकांत बाबर, विश्वस्त संजय काण्णव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
सहा तासांची शोधमोहीम
सकाळी नऊ वाजल्यापासून मातृतीर्थ कुंडात शोधमोहीम सुरू करण्यात आली. जीवरक्षक दलाच्या जवानांसह संबंधित पथकांनी तब्बल सहा तास अथक प्रयत्न केले. अखेर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अनिकेत तुरक यांचा मृतदेह शोधण्यात यश आले.
मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी माहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
यात्रेच्या काळातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पंचक्रोशी परिक्रमा यात्रेसाठी हजारो भाविक माहूरगडावर येत असताना घडलेल्या या घटनेने मातृतीर्थ कुंडासह अन्य जलसाठ्यांच्या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. यात्रेच्या काळात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता जीवरक्षकांची संख्या वाढविणे, धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि भाविकांना पाण्यात उतरण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.
एक भाविक यात्रेला आला… दर्शन-परिक्रमा पूर्ण केली; मात्र मातृतीर्थ कुंडातील पाण्याने त्याचा जीव घेतल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा?
नारळी पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र माहूरगडावर हजारो भाविक दाखल होत असताना मातृतीर्थ कुंडात भाविकाचा बुडून मृत्यू झाल्याने यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मातृतीर्थ कुंडासारख्या जलसाठ्याच्या ठिकाणी जीवरक्षक दलाची नियुक्ती नेमक्या कोणत्या निकषांवर करण्यात आली? नियुक्त जीवरक्षकांना पुरेसे प्रशिक्षण देण्यात आले आहे का? त्यांच्याकडे बचावासाठी आवश्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध आहेत का? या प्रश्नांची चौकशी होणे गरजेचे आहे.
जीवरक्षक उपस्थित असतानाही २८ वर्षीय भाविक अनिकेत वाल्मीक तुरक यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी तब्बल सहा तासांची शोधमोहीम राबवावी लागली. ही बाब केवळ दुर्दैवी घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.
प्रशासनाला आता उत्तर द्यावे लागणार!
यात्रेच्या काळात मोठ्या संख्येने भाविक जलसाठ्यांच्या ठिकाणी जात असल्याने प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करणे आवश्यक आहे. जीवरक्षकांची संख्या, त्यांचे प्रशिक्षण, बचाव साहित्य, आपत्कालीन वैद्यकीय मदत आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी होत आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली यंत्रणा प्रत्यक्ष संकटाच्या क्षणी किती सक्षम आहे? हा प्रश्न या घटनेनंतर अधिक गंभीर झाला आहे.
भाविकांच्या जीवाशी संबंधित सुरक्षेत कोणतीही हयगय होऊ नये, यासाठी प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.