जिल्हाताज्या घडामोडी

उपनगराध्यक्षपदाची निवडणूक; राजकुमार एंगडे बिनविरोध सर्वपक्षीय नगरसेवकांचा एकमुखी पाठिंबा; समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी

उपनगराध्यक्षपदाची निवडणूक; राजकुमार एंगडे बिनविरोध

सर्वपक्षीय नगरसेवकांचा एकमुखी पाठिंबा; समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी

वसमत / सिंहवाणी ब्युरो :
वसमत नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते तथा आमदार राजूभैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमार एंगडे यांची बिनविरोध निवड झाली. तहसीलदार सारंग चव्हाण, मुख्याधिकारी आतितोष चिंचाळकर तसेच नगराध्यक्ष सुनीताताई बाहेती यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.

विशेष म्हणजे, पक्षीय मतभेद बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप, शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनीही राजकुमार एंगडे यांच्या निवडीला एकमुखाने पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

निवडीची माहिती मिळताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समर्थक व समाजबांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करून, गुलालाची उधळण आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. निवडीनंतर राजकुमार एंगडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय — राजकुमार एंगडे

निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना राजकुमार एंगडे म्हणाले, “तालुक्याचे भाग्यविधाते आमदार राजूभैया नवघरे आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी माझी निवड बिनविरोध करून माझा मोठा गौरव केला आहे. पक्षाने सोपवलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन.”

वसमत शहराचा सर्वांगीण विकास, शहर स्वच्छ व सुंदर बनविणे हे आपले मुख्य ध्येय राहील, असेही एंगडे यांनी सांगितले. या विकासाच्या वाटचालीत सर्वांचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी लक्ष्मीकांत नवघरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे यशवंतराव उबारे, नगरसेवक धनंजय गोरे, गौतम वाव्हळे, युवराज आवटे, अविष्कार मनोहरे, विजयकुमार एंगडे, नारायण एंगडे, मिलिंद आळणे (बार्टी), अॅड. गोरखनाथ आव्हाड, इंजि. श्रीरंग मुळे, आनंदराव करवंदे, गौतम पारखे, दिनेश हनुमंते, रुपेश कदम, डॉ. रविंद्र तेलगोटे, सिद्धार्थ मोरे, भीमराव सरकटे, आकाश दातार, अरविंद कटाळे, दीपक भिसे तसेच पत्रकार संजय बर्दापुरे, पत्रकार अनिल पंडित आदींसह नागरिक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button