आम्ही हक्क मागतोय; मोठ्या भावाने आमच्या वाटेला येऊ नये’ माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांचे प्रतिपादन;

‘आम्ही हक्क मागतोय; मोठ्या भावाने आमच्या वाटेला येऊ नये’
माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांचे प्रतिपादन;
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये मातंग समाजाचा महामोर्चा
माहूर / सिंहवाणी ब्युरो : संजय घोगरे
अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाच्या नियोजनासाठी माहूर येथील हॉटेल आदिशक्ती येथे मातंग समाज बांधवांची बैठक पार पडली. यावेळी किनवटचे माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांनी, “आम्ही कोणाच्याही विरोधात नाही; आम्ही आमचा हक्क मागत आहोत. मोठ्या भावाने आमच्या वाटेला येऊ नये,” असे स्पष्ट प्रतिपादन केले.
के. मूर्ती म्हणाले की, आरक्षणाच्या बाबतीत आजवर समता, न्याय आणि बंधुतेच्या भावनेने काम झाले असते, तर मातंग समाजाला आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती. अनुसूचित जाती आरक्षणातील वंचित घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य संधी मिळावी, यासाठी उपवर्गीकरणाची मागणी करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली असून, त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यामुळे शासनाने कोणताही विलंब न करता उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘आमची मुले सुशिक्षित झाली; त्यांनाही संधी मिळाली पाहिजे’
“मातंग समाजातील आमची मुले आता मोठ्या प्रमाणात सुशिक्षित झाली आहेत. त्यांनाही शिक्षण, रोजगार आणि प्रगतीच्या समान संधी मिळण्याची गरज आहे. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी आवश्यक आहे. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलनाचा रेटा कायम ठेवावा लागेल,” असा इशारा के. मूर्ती यांनी दिला.
यावेळी त्यांनी तेलंगणा राज्यात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाल्याचा दाखला देत महाराष्ट्र सरकारनेही याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
‘आमचे भांडण समाजाशी नाही, शासनाच्या धोरणाशी’
मातंग समाजाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीवरून बौद्ध समाजातील काही नेत्यांकडून होत असलेल्या टीकेबाबतही बैठकीत चर्चा झाली. यावर भूमिका स्पष्ट करताना के. मूर्ती म्हणाले, “आमचा कुणालाही विरोध नाही. आमचे भांडण समाजाशी नसून शासनाच्या धोरणाशी आहे.”
समाजामध्ये परस्पर वैमनस्य निर्माण होऊ नये. प्रत्येक समाजघटकाने आपल्या हक्कांसाठी लोकशाही आणि संविधानिक मार्गाने संघर्ष करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नांदेड महामोर्चासाठी एकजुटीचे आवाहन
बैठकीदरम्यान १३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे होणाऱ्या महामोर्चाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. मातंग समाजातील सर्व बांधवांनी आपापली कामे बाजूला ठेवून मोठ्या संख्येने नांदेड येथे उपस्थित राहावे आणि महामोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीस नारायण सांगळे, गंगाधर तोटरे, मारुती गोटमुकले, नारायणराव माडपेल्लीवार, देवानंद भांडवले, अनिल माडपेल्लीवार, मिलिंद चांदणे, दत्ता आठवले, गजानन जोगदंड, तुषार आमटे, ज्ञानेश्वर पतंगे, इंद्रजीत नेवारे, भीमाशंकर सूर्यवंशी, आकाश पतंगे, दशरथ उबाळे, गणेश लोंढे, किरण टाकळीकर, सतीश उमाप, कमलेश जोगदंड यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.